५० टक्के लाेकांनी घेतला लसीचा पहिला डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:41 AM2021-09-07T04:41:32+5:302021-09-07T04:41:32+5:30
देऊळगाव राजा : काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता प्रशासनाच्यावतीने लसीकरणावर भर देण्यात येत आहे़ देऊळगाव राजा तालुक्यात ...
देऊळगाव राजा : काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता प्रशासनाच्यावतीने लसीकरणावर भर देण्यात येत आहे़ देऊळगाव राजा तालुक्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के नागरिकांनी पहिला डाेस, तर ३५ टक्के लाेकांनी दाेन्ही डाेस घेतलेले आहेत़
देऊळगाव राजा तालुक्यात एकूण अपेक्षित लाभार्थी एक लाख ८ हजार ७२६ असून त्यापैकी ५४ हजार ३८३ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे़ एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांचा एक डोस पूर्ण झालेला आहे़ कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लोकांची संख्या ३८ हजार २५३ आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात एकूण आरोग्य कर्मचारी (खासगी व सरकारी ) १ हजार १३७ असून ९९८ (८७ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फ्रंटलाईन वर्करची संख्या १ हजार ९८० असून १ हजार ९४९ (९८ टक्के) वर्करचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. तसेच १८ ते ४४ वयोगटातील एकूण ६१ हजार ८४८ लोकसंख्या असून त्यापैकी १५ हजार ४८९ (२५ टक्के) लोकांना लसीचा एक डोस पूर्ण झालेला आहे. तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्या ४३ हजार ७६१ असून त्यापैकी १९ हजार ८१७ लोकांचा (४५टक्के) एक डोस पूर्ण झालेला आहे.
सहा केंद्रांवर सुरू आहे लसीकरण
ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा व देऊळगाव मही, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा व जवळखेड अंतर्गत दररोज ५ ते ६ लसीकरण केंद्रांमार्फत रोज कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच आजपर्यंत तालुक्यातील जवळपास ४९ गावांमध्ये जाऊन त्याठिकाणी कोराेना लसीकरणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे यांनी दिली.
लस घेण्याचे आवाहन
कोरोना लसीकरणाच्या कामासाठी व कोरोना साथ नियंत्रण करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पंचायत समिती कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहभागातून एवढी मोठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचे दाेन्ही डाेस घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे़