दरेगाव येथे रस्त्याच्या वादातून दाेन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:44+5:302021-06-10T04:23:44+5:30
साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दरेगाव येथील दोन चुलत भावात शेतात जाणाऱ्या रस्त्यावरुन कुऱ्हाडीने एकमेकांवर वार केल्याने ...
साखरखेर्डा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दरेगाव येथील दोन चुलत भावात शेतात जाणाऱ्या रस्त्यावरुन कुऱ्हाडीने एकमेकांवर वार केल्याने १० व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन्ही गटाच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
दरेगाव येथील पुरुषोत्तम दत्तू शिंदे आणि शिवाजी भानुदास शिंदे या दोघांचे शेत जवळजवळ असून या दोघांमध्ये रस्त्यावरुन नेहमीच वाद निर्माण होतात. या अगोदर सुद्धा वाद झाल्याने एकमेकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे . ८ जून रोजी पुरुषोत्तम दत्तू शिंदे हा सकाळी शेतात काम करण्यासाठी कुटुंबासह गेला होता. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शिवाजी भानुदास शिंदे यांच्या शेतातील रस्त्याने जात असताना त्यांना शिवाजी शिंदे ,भानुदास शिंदे ,संदीप गंगावते, गणेश गंगावते यांनी वाद घातला़ या वादातून दोन्ही गटात कुऱ्हाड , धारधार शस्त्र , आणि लाठ्या काठ्यांनी तुफान हाणामारी झाली. यात पुरुषोत्तम दत्तू शिंदे , दत्तू आश्रू शिंदे , संगीता पुरुषोत्तम शिंदे , पार्वती दत्तू शिंदे , शिवाजी शिंदे , भानुदास शिंदे , संदीप गंगावते , गणेश गंगावते , सत्यभामा शिंदे , मनकर्णाबाई शिंदे हे १० जण जखमी झाले . शेजारील शेतकऱ्यांनी यांचे भांडण सोडवून जखमी व्यक्तींना साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये आणले . गंभीर जखमी असलेल्यांना ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारीवरून दाेन्ही गटाच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत .