रोहित्रामध्ये फ्यूज लावण्यावरून हाणामारी; तीन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:11 PM2021-02-17T12:11:12+5:302021-02-17T12:11:21+5:30
Crime News घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : शेतातील रोहित्रामध्ये फ्यूज टाकण्यावरून उद्भवलेला वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीत झाले. परस्परांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली. त्यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले.
शोभा ज्ञानदेव हागे यांच्या वानखेड शिवारातील शेतातील रोहित्रामध्ये फ्यूज टाकण्यासाठी चौघेजण आले होते. शेतमालकांनी या चौघांना शेतात रोहित्रात काम करण्यास मनाई केली. फ्यूज टाकण्यास शेतात येऊ न दिल्याने चौघांनी शिवीगाळ केली. त्यामुळे वाद पेटला. शिवीगाळीचे रूपांतर हाणामारीत झाले. चौघांनी शेतमालकाच्या मुलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यातील एकाने शोभा हागे यांचा मुलगा शिवहरी हागे याच्या मंनगटावर कोयत्याने वार करून जखमी केले. तर दुसऱ्याने दुसरा मुलगा संदीप हागे यांच्या डाव्या बरगडीवर कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शोभा हागे यांनी तामगाव पोलीसात तक्रार दिली. त्यावरून अंबादास तुळशीराम पचांगे, करण अंबादास पचांगे, अजय अंबादास पचांगे, अनिकेत पचांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सपना पचांगे यांच्या तक्रारीनुसार हागे यांच्या शेतातील रोहित्रात फ्यूज टाकण्यासाठी गेले असता दोघांनी शिवीगाळ केली. त्यांना समजावण्यासाठी पती व मुलगा घटनास्थळावर गेले. मात्र या दोघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचा हात पिरगळला. मुलगा करन पचांगे याच्या मनगटासह पाठीवर कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून शिवहरी ज्ञानदेव हागे, संदीप हागे या दोन्ही आरोपींवर कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील गंभीर जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.