मलकापूरात अंकूर सिड्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:14 PM2018-07-29T23:14:27+5:302018-07-29T23:15:52+5:30

अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे.

Filing a complaint against Ankur Sidhu in Malakpur | मलकापूरात अंकूर सिड्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मलकापूरात अंकूर सिड्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

मलकापूर: अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कंपनीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा व कलम ४२० अन्वये २९ जुलैरोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
    अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून विभागीय कृषी सह संचालक अमरावती विभागातील बियाणे निरीक्षक तथा तंत्र अधिकारी डॉ. पंकज चेडे यांनी १८ मे रोजी नमुने घेतले होते. संकरित कापूस अंकुर ३०२८-बी जी- २ (लॉट नं १५४-३७८९२, टॅग नं  १०८७५०२) या सत्यता दर्शक वाणाचा नमुना महाराष्ट्र कापूस बि-बियाणे नियम, २०९ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम १० व ११ अन्वये विश्लेषणाकरीता ताब्यात घेण्यात आला होता. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे २५ मे रोजी हा नमुना विश्लेषणाकरीता सादर करण्यात आला होता. त्यानंतर १९ जुलै रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या विश्लेषण अहवाला नुसार केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेले तणनाशकास सहनशील अंश ३० % पॉजीटीव्ही आढळून आलेले आहे. अश्या बियाण्याच्या वापरामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होऊन शेतीचे तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वास्तविकत: अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी, २७, नवीन कॉटन मार्केट नागपूर यांनी महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २००९ नुसार कापूस बियाणे दर्शविल्याप्रमाणे वास्तविक नसणे, बनावट/प्रतिबंधित असणे, नमूद केलेल्या जणुकाशिवाय इतर परिभाषित बियाणे जणूकाचा समावेश करणे , कापूस बियाणे नोंदणी केलेल्या वैशिष्टांपैकी नसणे,पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार कथीत केल्याप्रमाणे बियाणे परिभाषित नसणे, गैरमानक बियाण्याची विक्री करणे लेबलवर खोटे दावे करणे, पाकिटावर तणनाशकास सहनशील जनुकीय अंश असणारे बियाणे नाही असे नमूद आहे. असे असतांनाही तणनाशकास सहनशील जनुकीय अंश कापूस बियाण्यांची विक्री करणे तसेच पर्यावरण दृष्ट्या प्रतिबंधात्मक पदार्थाच्या हाताळणीसाठी कार्य पद्धती व सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करणे, प्रतिबंधित बियाण्याची माहिती न देणे-लपवणे, तसेच महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २०९ चे कलम १३ व पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ कलम १५ अन्वये शिक्षेस पात्र आहे. त्याचप्रमाणे भारतीय दंड विधान कलम ४२० नुसार कापूस बियाणे विक्री पाकिटावर केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेले एच टी जिन या बीयाण्यांमध्ये नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. असे असतांनाही तणनाशकास सहनशील जनुकीय अंश कापूस बियाण्याची विक्री केली आहे.  याप्रकरणात कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत मात्र संकरित कापूस बि जी २ कापूस बियाण्याचे उत्पादक करण्याचाच परवाना असतांना सुद्धा पर्यावरणास हानिकारक तणनाशकास सहनशील जनुकीय अंश असणा-या अनधिकृत कापूस बियाण्याचे उत्पादन व विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केलेले असल्याने अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनीचे नागपूर स्थित व्यवस्थापकीय संचालक तसेच जबाबदार अधिकारी बी चिरंजीवी रेड्डी, उपप्रादेशिक व्यवस्थापक मलकापूर यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार विभागीय कृषी सह संचालक अमरावती विभागाचे बियाणे निरीक्षक तथा तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) डॉ.पंकज चेडे यांनी २८ जुलै रोजी रात्री मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिली. यावेळी अमरावतीचे विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत म्हस्करे व बुलढाण्याचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक प्रवीण खर्चे उपस्थित होते.  
शहर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २००९ नुसार  कलम 13, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार १५ अश्या प्रकारे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पो.नि.रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पो.उ.नि.अमोल बच्छाव करीत आहे. (प्रतिनिधी)

- मान्यता नसलेला जिन तपासणीत आढळल्याने प्राप्त झालेल्या अहवालावरूनच अंकुर सिड्स प्रा.ली.विरुद्ध कार्यवाहीचे पाऊल उचलण्यात आले. 
-प्रवीण खर्चे
जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक,बुलढाणा.

Web Title: Filing a complaint against Ankur Sidhu in Malakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.