नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढणार -विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:06 PM2021-02-08T12:06:58+5:302021-02-08T12:07:08+5:30

Vijay Vadettiwar महत्त्वपूर्ण घोषणा मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.

To fill the backlog of OBCs in recruitment - Vijay Vadettiwar | नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढणार -विजय वडेट्टीवार

नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढणार -विजय वडेट्टीवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : ओबीसींचे आरक्षण व पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढण्याला प्राधान्य राहील, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यासह मूलभूत समस्या सोडविण्यात येतील. एवढेच नव्हे, तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
कोल्हटकर मंगल कार्यालयात रविवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव महाअधिवेशन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे, तर माजी कामगार कल्याणमंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. राजेश एकडे, माजी आमदार नारायण मुंडे, दिलीपकुमार सानंदा, राहुल बोंद्रे, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अमलकार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी राणे, विठ्ठल लोखंडकार, दत्ता खरात उपस्थित होते.  
ओबीसी समाजबांधवांनी आपसातील वाद सोडून न्याय मिळविण्यासाठी एकजुटीने काम करावे, असा सल्ला यावेळी वडेट्टीवार यांनी दिला. बहुजनांवरील अन्याय सहन करणार नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी आपण स्वत:हून आग्रही भूमिका घेतली आहे. 
ओबीसींच्या आरक्षणाला थोडाही धक्का लागू देणार नाही. येणाऱ्या काळात ३० हजार ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ. माणूस, राजकीय नेता आणि मंत्री नव्हे, तर ओबीसींचा एक घटक म्हणून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष रमेश घोलप यांनी समाजाच्या समस्यांचे विस्तृत विवेचन केले. अध्यक्षीय भाषणातून तायवाडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली. सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. महाभरती करून १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींकडे केली.  प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल अमलकार, तर संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले.

Web Title: To fill the backlog of OBCs in recruitment - Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.