घरबसल्या मोबाईलवरून देता येईल अंतिम वर्षाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:08 PM2020-09-12T12:08:44+5:302020-09-12T12:09:04+5:30
ही परीक्षा आता मोबाईलवरून घरूनच विद्यार्थी परीक्षा देउ शकणार आहेत.
- संदीप वानखडे
बुलडाणा: ऑफलाईन परीक्षांच्या नियोजनास शासनाची मंजूरी न मिळाल्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/ सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा आता मोबाईलवरून घरूनच विद्यार्थी परीक्षा देउ शकणार आहेत. तसेच अभियांत्रिकीच्या आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तर अन्य शाखांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याची घोषणा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर आणि परीक्षा व मुल्य मापन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख यांनी शुक्रवारी केली.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आॅफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. हे नियोजन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाने तंत्रज्ञानाचा जास्तीत वापर करण्याची सुचना केल्याने विद्यापीठाने परीक्षा आॅनलाईन घेण्याची घोषणा केली आहे. अंतिम वर्ष/सत्राच्या विद्यार्थ्यांना अॅड्रॉइड मोबाईलवरून देता येणार आहे. ही परीक्षा बहु पर्यायी प्रश्नांची राहणार असून प्रत्येक युनीटवर १० प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी चार पर्याय दिलेले राहणार आहेत. तसेच ५० टक्के प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. सहा युनिट असलेल्या विषयाचे ६० प्रश्न देण्यात येणार असून त्यापैकी ३० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार असून मोबाईल अॅपवर ही परीक्षा द्यावी लागणार आहे. अॅपवर लॉगीन केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळणार आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार असून वेळ संपल्यानंतर विद्यापीठाच्या सर्व्हरवर सेव्ह होणार आहे. ५० टक्के अंतर्गत आणि ५० टक्के लेखी गुणांच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रात्याक्षिक परीक्षाही आॅनलाईनच घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अॅड्रॉइड मोबाईल नाही त्यांना जवळच्या महाविद्यालयात आॅफलाईन परीक्षा देण्याची सोय विद्यापीठाने केली आहे. परीक्षाविषयीचे सविस्तर आदेश विद्यापीठ १२ सप्टेंबर रोजी जारी करणार आहे.
कुलगुरुंनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर व परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख यांनी ११ सप्टेंबर रोजी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व पालकांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थींनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरेही देशमुख यांनी दिली. तसेच परीक्षेचे स्वरुप कसे राहीले, केव्हा होईल, निकाल कसा लागणार याविषयी सविस्तर माहिती दिली.
मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनचा प्रस्ताव
ज्या विद्यार्थ्यांकडे अॅड्रॉइड मोबाईल नाही तर तसेच इंटरनेटची समस्या आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाईन परीक्षा देण्याची सुविधा विद्यापीठाने दिली आहे. या विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयातच परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना २२ सप्टेंबरपर्यंत माहिती द्यायची आहे. तसेच ज्या महाविद्यालयात परीक्षा द्यायची असेल त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना बहु पर्यायी प्रश्नपत्रिका महाविद्यालयात सोडवावी लागणार आहे.
प्रात्याक्षिक परीक्षाही ऑनलाईन होणार
अंतिम वर्ष / सत्राच्या प्रात्याक्षिक परीक्षाही आॅनलाईन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न बोलवता झुम किंवा फोनवर प्रश्न विचारून प्रात्याक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्याक्षिक परीक्षा महाविद्यालयांना घ्याव्या लागणार आहे. त्यासाठी बाहेरुन एक्स्टर्नल न बोलवता महाविद्यालयातील प्राध्यापकांचीच नियुक्ती करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.