अखेर जप्त रेशन तांदूळप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: April 4, 2017 12:49 AM2017-04-04T00:49:45+5:302017-04-04T00:49:45+5:30
जप्त रेशन तांदूळप्रकरणी नांदुरा पोलिसांनी ओमप्रकाश राठी याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
नांदुरा : तहसीलदार वैशाली देवकर यांच्या पथकाने शनिवार, १ एप्रिलच्या रात्री बाजार समिती मागील बुलडाणा रोडजवळ असलेल्या राठी यांच्या शेतातील गोडावूनवर छापा टाकून रेशनचे १८४ कट्टे तांदूळ जप्त केला होता. अखेर २६ तासानंतर २ एप्रिलच्या रात्री ११ वाजेदरम्यान नांदुरा पोलिसांनी ओमप्रकाश राठी याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
तालुक्यात रेशन माफिया मोठ्या प्रमाणात धान्याची अफरातफर करीत असल्याने गोरगरिबांचे धान्य काळ्या बाजारात जात असल्याची ओरड होती. यापूर्वीचे पुरवठा अधिकारी व गोदाम निरीक्षक बरगे यांच्याविरुद्ध तक्रारी झाल्या होत्या. मात्र, याबाबत ठोस माहिती प्राप्त होताच तहसीलदार वैशाली देवकर यांनी पथकासह द्वारपोच धान्य योजनेचे शासकीय कंत्राटदार तथा रेशन दुकानदार ओमप्रकाश राठी यांच्या शेतातील गोदामावर अचानक १ एप्रिलच्या रात्री छापा टाकला असता, त्यांच्या गोदामात १८४ कट्टे तांदूळ आढळून आला. तसेच त्यांच्या गोदामाबाहेर शासकीय कट्टे आढळून आल्याने तहसीलदार देवकर यांनी पंचनामा केला होता.
याबाबत पुरवठा निरीक्षक गजानन राजगडे मलकापूर यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री ११ वाजता ओमप्रकाश राठीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहेपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर कांदुरे करीत आहेत. तालुक्यात रेशन माफिया सक्रिय झाल्याने सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच आता व्दारपोच योजनेचा शासकीय कंत्राटदारच्याच गोडावूनमध्ये रेशनचा तांदूळ व बाहेर शासकीय मालाचे खाली कट्टे आढळल्याने द्वारपोच योजनेतच गौडबंगालचे गुपीत उघड झाले आहे. तसेच यापूर्वीच पुरवठा अधिकारी व गोदाम निरीक्षक बरगे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारींवर वेळेतच योग्य कारवाई झाली असती, तर तालुक्यात रेशन माफियांवर नियंत्रण मिळवता आले असते. त्यामुळे आता पुरवठा विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची चाचपणी करणे गरजेचे झाले आहे.