..अखेर शिक्षिका ठग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:52 PM2017-09-12T23:52:40+5:302017-09-12T23:52:40+5:30
खामगाव : एकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकार्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेच्या स्वाक्षरी पटावर नियमीत सही करून सध्या सोनाळा ता. संग्रामपूर येथे कार्यरत असलेल्या शिक्षिकेने एमएडच्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक विद्यालयातही विद्यार्थीनी म्हणून प्रवेश घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या शिक्षिकेविरोधात ४ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या चिखला येथील जिल्हा परिषद शाळेवर श्रीमती कल्पना भगवान ठग ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी सन २0१२-१३ मध्ये बी.एड. व सन २0१३-१४ मध्ये एम.एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. यासाठी त्यांनी शाहू महाराज अध्यापक विद्यालय माळविहीर येथे रितसर प्रवेश घेतला होता. तसेच चिखला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरही उपस्थित असल्याचे हजेरी पटावरून दिसून आले. या संदर्भात शिक्षिका ठग यांनी फसवणूक केल्याचे सिध्द झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी एम.वाय. आंधळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कल्पना ठग यांच्याविरूध्द ४२0 चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खामगाव येथील पत्रकार संजय वर्मा यांनी १५ जानेवारी २0१६ रोजी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग तसेच तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ व कल्पना ठग यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र त्यावेळी कारवाई न झाल्याने उपरोक्त तीघी विरोधात गुन्हा दाखल होवू शकला नाही. दरम्यान शासनाची फसवणूक करणार्या कल्पना ठग यांच्याप्रमाणेच त्यांची पाठराखण करणार्या तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी दिपा मुधोळ आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय वर्मा यांनी केली आहे.