...अखेर महामार्गावरील विद्युतदिवे उजळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:30+5:302021-08-27T04:37:30+5:30
महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत गत दोन वर्षांपासून पथदिवे उजळण्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील २३० ...
महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत गत दोन वर्षांपासून पथदिवे उजळण्याची प्रतीक्षा होती. मात्र, आता नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील २३० पथदिवे व ३ हाय मास्ट दिवे लवकरच प्रकाशमय होणार आहेत. मेहकर फाटा येथील राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या पुतळ्यापासून औद्योगिक परिसर, महाबीज, रेणुकामाता पेट्रोलपंप, जाफराबाद रोड चौफुली, रेस्ट हाऊस परिसर, छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, बसस्थानकामागील परिसर, पाटबंधारे विभाग परिसर, बीडीसीसी बँक खामगाव चौफुली, पंचमुखी महादेव मंदिरपर्यंतच्या महामार्गावर २३० पथदिवे लावण्यात आलेले आहेत. मात्र रस्त्याचे काम होऊन व पथदिवे बसवून दोन वर्षे उलटली असतानाही, विद्युत जोडणीअभावी हे पथदिवे बंदच होते. याची दखल घेत नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून या मार्गावरील पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर मंजूर करून घेतले आहे. या पथदिव्यांचा विद्युत भार नगरपरिषदेवर राहणार आहे. दरम्यान, याबाबतच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या असून लवकरच या महामार्गाला रात्रीच्यावेळी झळाळी प्राप्त होणार आहे. तथापी महामार्ग व शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
जनभावनेचा सन्मान : नगराध्यक्षा बोंद्रे
यापूर्वीच हे पथदिवे सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे काम महामार्ग अथॉरिटीकडे असल्याने प्रशासकीय अडचणीमुळे त्याला विलंब होत होता. चिखलीच्या सौंदर्यात भर पाडण्याचा उद्देश, त्याबरोबरच या मार्गावर सतत होणारे अपघात यांचा विचार करून आणि जनभावना पाहता, सभागृहातील सदस्यांना सोबत घेऊन या पथदिव्यांच्या बिलाचा खर्च पालिकेमार्फत उचलण्याची तयारी दर्शवली. त्याबद्दल नगरसेवक व मुख्याधिकारी यांचे सहकार्य लाभले. जनतेच्या भावनांचा सन्मान करत हे पथदिवे अल्प कालावधीमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी दिली आहे.