अखेर १८ गावांतील पथदिवे झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:47+5:302021-04-14T04:31:47+5:30
अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. ...
अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. त्यावर प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग नेते व उंद्री ग्रा.पं. सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनीकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच आंदाेलनाचा इशारा दिला हाेता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत महावितरणने १२ एप्रिल राेजी १८ गावातील बंद पथदिवे सुरू केले आहेत.
या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या, रामनवमी, गुढीपाडवा, रमजान, असे धार्मिक सण आहेत. आधीच कोरोनामुळे सण, उत्सवांवर विरजण पडले आहे. यातच महावितरण कंपनीने वीज देयक थकीत असल्याने उंद्री सर्कलमधील अठरा गावांतील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदींसह महावितरण कंपनी बुलडाणा यांच्याकडे निवेदन दिले हाेते, तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उपअभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव यांना वरिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार उंद्री वैरागडसह १८ गावांतील पथदिवे सुरू केले. यावेळी शिवाजी पाटील, राम नसवाले, आकाश राऊत, पत्रकार वसंत सिरसाठ आदी उपस्थित हाेते.