अखेर माेताळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:35+5:302021-06-20T04:23:35+5:30
शहराला नगर पंचायतच्या मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये. तसेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण ...
शहराला नगर पंचायतच्या मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये. तसेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी येथील नगर पंचायत प्रशासन प्रयत्नरत होते. परंतु दुसरीकडे शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या शहरातील असंख्य नागरिकांच्या तोंडी व लेखी तक्रारी होत्या. शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायत प्रशासन प्रयत्नरत असताना ऐन पावसाळ्याला सुरुवात झाली.
पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे १२ जून रोजी शहराला पाणीपुरवठा करणारे मोटार पंप जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळगंगा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने शहराला शुद्ध आणि अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी नगर पंचायत मध्ये ठिय्या आंदोलन करून नगर पंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. १७ जून रोजी संध्याकाळी मोटार पंप बसवून १८ जून रोजी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
शुद्ध पाण्याचा पुरवठा करा
माेताळा शहरात गत काही दिवसांपासून पिवळसर पाण्याचा पुरवठा हाेत आहे़ त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करावी तसेच शहराला नळाद्वारे येत असलेल्या पाण्यामध्ये ब्लिचिंग तथा तुरटीचा वापर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने नगर पंचायतने याकडे लक्ष देण्याची गरज आहे़