मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:31 AM2021-04-12T04:31:59+5:302021-04-12T04:31:59+5:30
२०२० हे संपूर्ण वर्ष मंडप डेकाेरेशन व्यावसायिकांसाठी अवघड गेले. नवीन वर्षात तरी कार्यक्रमाचे बुकिंग हाेईल, अशी आशा व्यावसायिकांना हाेती; ...
२०२० हे संपूर्ण वर्ष मंडप डेकाेरेशन व्यावसायिकांसाठी अवघड गेले. नवीन वर्षात तरी कार्यक्रमाचे बुकिंग हाेईल, अशी आशा व्यावसायिकांना हाेती; परंतु तसे झाले नाही. काेराेनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा व्यवसाय ठप्प पडला. दरवर्षी दिवाळीनंतर विविध धार्मिक कार्यक्रम तसेच विवाह होतात. त्यामुळे मंडप व्यावसायिक सुरुवातीलाच दरवर्षी नवीन साहित्य खरेदी करून ठेवतात. यावर्षीसुद्धा अनेक व्यावसायिकांनी अनेक वस्तूंची खरेदी केली होती. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काही कार्यक्रमही मंडप व्यावसायिकांनी घेतले; परंतु शासनाने पुन्हा बंधने लादल्याने कार्यक्रमांवर मर्यादा आली. माेजकेच मंडप डेकोरेशन लावून काम भागवले जात आहे. या व्यवसायावर अनेक मजूर काम करतात. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत या व्यावसायिकांचा बऱ्या प्रमाणात व्यवसाय होतो. या कार्यक्रमांवरच व्यावसायिक वर्षभराची कमाई करतात. येथे काम करणाऱ्या अनेक मजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत असतो. मात्र, आता हा व्यवसाय थंडच असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.