खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:50 AM2020-07-18T10:50:24+5:302020-07-18T10:50:30+5:30
लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने पालक आर्थिक संकटात असतानाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून त्यांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय बंद आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने पालक आर्थिक संकटात असतानाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून त्यांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. पालकांना फी सक्ती करू नये, अशा शासनाच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील अनेक शाळा पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत. आॅनलाइन वर्ग सुरू केलेले असतानाही गणवेशाची सक्ती करण्यात येत असल्याने पालक अडचणीत सापडले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात आल्या नसल्या तरी शैक्षणिक सत्राला सुरूवात करण्यात आली आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. सर्वत्र आॅनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतू खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांकडे फी वसूलीसाठी वारंवार तगादा लावल्या जात असल्याच्या ओरड होत आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची मागील वर्षाची व सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले आहेत. परंतू या आदेशाला सध्या जिल्ह्यातील शाळांकडून खो दिल्या जात आहे. मागील वर्षीची फी न भरल्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखले असल्याची माहिती आहे. नविन वर्षाच्या फीसाठी सुद्धा फोन करून पालकांना वेठीस धरले जात आहे. काहींनी समोरच्या वर्गात प्रवेश दिला; मात्र आॅनलाइन शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याचे काही पालकांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले आहे.
शाळा बंद, गणवेश कशासाठी?
विद्यार्थ्यांचे घरूनच आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. तरीसुद्धा काही शाळा पालकांना गणवेशासाठी पैसे मागत आहेत. शाळा बंद असल्याने व शाळेत जाण्याची गरज नसतानाही गणवेश कशासाठी? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.
पुस्तकांच्या अवाजवी किंमती
पुस्तकांच्या अवास्तव किंमती पालकांकडून वसूल केल्या जात आहेत. के.जी.वन व केजी टू या वर्गाच्या पुस्तकांसाठी दोन ते अडीच हजार रुपये पालकांकडून घेतले जात आहेत. त्यामध्ये पाच पुस्तके व पाचच वह्या दिल्या जातात. या पुस्तकांची पावती पालकांना दिल्या जात नाही.
शिक्षण विभाग बघते तक्रारीची वाट!
फी वाढ किंवा कुठल्याही संस्थेने फी भरण्यासाठी सक्ती केल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने समिती नेमलेली आहे. परंतू या समितीकडे दोन महिन्यात एकही लेखी तक्रार आलेली नाही. ज्या शाळेत आपला पाल्य आहे, त्या शाळेची तक्रार करण्यास पालक समोर येत नाहीत. परंतू शिक्षण विभाग तक्रारींची वाट पाहत आहे.
फी वाढीसंदर्भात लेखी तक्रार आलेली नाही. त्यामुळे कारवाई करू शकत नाही. पालकांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक बुलडाणा.