बहिणीचे लग्न मोडून फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 03:03 PM2018-05-01T15:03:25+5:302018-05-01T15:03:25+5:30
खामगाव शहरातील अरुणोदय नगर भागातील एका तरुणाच्या बहिणीचे लग्न मोडून समाजात बदनामी केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा - खामगाव शहरातील अरुणोदय नगर भागातील एका तरुणाच्या बहिणीचे लग्न मोडून समाजात बदनामी केल्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी मंगळवारी केली. या कारवाईमुळे पुणे येथील होले कुटूंबियांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील अरुणोदय नगर जलंब रोड भागातील एका तरुणाच्या बहिणाच्या विवाहाचा योग हरणखेड येथील अमित रामदास होले ह.मु.पुणे यांच्याशी ठरला होता. हा संबंध जुळवितांना हरणखेड येथील मनोज रामदास होले, रामदास हरी होले ह.मु.पुणे, गजानन जगन्नाथ कोल्हे रा. मलकापूर, श्रीकृष्ण जगन्नाथ कोल्हे रा. मलकापूर, प्रमोद रविंद्र भोळे रा. उत्तर प्रदेश, कल्पना प्रमोद भोळे रा.उत्तर प्रदेश व आर.के. पाटील रा. अकोला यांच्या संमतीने विवाह संबंध जुळुन आला होता. त्यानुसार २८ जून २०१८ रोजी विवाह करण्याचे ठरले होेते. मात्र मध्यतंरीच्या काळात आठही जणांनी संगनमत करुन संबंधित तरुण व त्यांच्या परिवाराशी कोणताही संपर्क न करता विवाह मोडला. दरम्यान बहिणीच्या लग्नाची पूर्व तयारी म्हणून संबंधित तरुणाने मंगल कार्यालय, फोटो ग्राफर, आचारी आणि तत्सम बाबीची पूर्तता केली होती. याबाबत होले कुटुंबीयांनाही सूचना देण्यात आली होती. मात्र होले कुटुंबीयांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित तरुणाने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी उपरोक्त आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४१८,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय तावडे करीत आहे.