डोणगावातील भाजी बाजाराला आग, पावणे दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:35+5:302021-03-22T04:31:35+5:30
ही आग २१ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागली होती. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश खडसे व ...
ही आग २१ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागली होती. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश खडसे व चालक वाघ यांना भाजी बाजारातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तिकडे मोर्चा वळविला असता, चार भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे त्वरित त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रोठड यांना माहिती दिली. सोबतच अग्निशमन दलाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ न शकल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. मात्र, तोवर भाजीपाला विक्रेत्यांचे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झालेले होते.
या आगीत भाजीपाला विक्रेते पवन अरुण काळे कुसूम उत्तम जयवाळ, गोपाल माधव परमाळे भगवान आश्रूजी काळे यांच्या दुकानातील बटाटे, कांदा, लसूण, अडत काटा, प्लेट काटा, कॅरेट, खुर्च्या व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी पल्लवी गुंठेवार, कोतवाल संतोष मानवतकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. त्यात पवन काळे यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. कुसूम जयवाळ यांचे १९ हजार, गोपाळ परमाळे यांचे ४५ हजार आणि भगवान काळे यांचे ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
‘त्या’ आगीचा तपास कधी
गेल्या काही दिवसांपूर्वी डोणगाव येथील एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीची दुचाकीही अज्ञात व्यक्तीने जाळली होती. त्याचा अद्याप तपास लागलेला नसतानाच, आता चार भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे जाणीवपूर्वक कोणी अज्ञात व्यक्ती तर आग लावत नाही ना, असा संशय स्थानिक व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायतीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग तपासल्यास या प्रकरणाचा छडा लागण्यास मदत होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.