धाड येथील औषध दुकान आणि दवाखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:31 AM2021-04-03T04:31:07+5:302021-04-03T04:31:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धाड : शहरातील एका पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या एका औषध दुकानासह दवाखान्याला शार्ट सर्किटमुळे आग लागली. ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : शहरातील एका पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या एका औषध दुकानासह दवाखान्याला शार्ट सर्किटमुळे
आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता दरम्यान उजेडात आली. या आगीत तब्बल ३६ लक्ष ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद रोडवरील श्रीकृष्ण डिगांबर पडोळ आणि सुभाष डिगांबर पडोळ यांच्या मालकीचे व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलातील दुकाने डॉ.नीलेश सुरेश सोनूने रा.दुधा व सतीश शालीकराम सुरोशे रा.सातगाव म्हसला यांना भाडेतत्त्वावर जागा दिली आहे.
या ठिकाणी मागील साधारण १२ वर्षांपासून उपरोक्त व्यवसाय सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता दरम्यान, जय मातादी मेडिकल दुकानातून धूर निघत असल्याचे परिसरातील रहिवासी असलेल्या गणेश उमेश जाधव रा.धाड या युवकाच्या निर्दशनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखत, बस स्थानक परिसरातील सतीश जाधव यांच्या मालकीचे खासगी पाण्याचे टँकर गणेशने स्वत: चालवित, औषध दुकान आणि दवाखान्याला लागलेली आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ही आग आटोक्यात येणार नसल्याचे निदर्शनास येताच, गणेशने तातडीने घटनेची माहिती आपल्या मित्रांना दिली. त्यानंतर, शुभम् पांडे, वैभव माळोदे, अरविंद वाघुर्डे, बालाजी माळोदे, गणेश नेमाडे, यांसह टँकरधारक सतीश जाधव, गजानन देशमुख आदी नागरिक घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केलेत.
चौकट...
औषध दुकानातील ३२ लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
जय मातादी मेडिकल स्टोअर्समधील ३१ लाख ९५ हजार रुपयांचा औषधीसाठा आणि साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. त्याच वेळी डॉ.सोनुने क्लिनिकचे ४ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सतीश सुरोशे आणि डॉ.नीलेश सोनूने यांनी पोलीस ठाण्यात आणि महसूल विभागाच्या तलाठी प्रभाकर गवळी, मंडळ अधिकारी गणेश राऊत यांना घटनेची माहिती दिली आहे. त्यावरून त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे.