हार्डवेअरच्या गोडाऊन परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:49+5:302021-04-10T04:33:49+5:30

बुलडाणा : चिखली रोडवरील साईनाथ अग्रवाल यांच्या हार्डवेअर गोडाऊन परिसरात ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग ...

Fire in the hardware godown area | हार्डवेअरच्या गोडाऊन परिसरात आग

हार्डवेअरच्या गोडाऊन परिसरात आग

Next

बुलडाणा : चिखली रोडवरील साईनाथ अग्रवाल यांच्या हार्डवेअर गोडाऊन परिसरात ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान अग्निशामक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पथकाने पाण्याचा मारा करून ही आग काही वेळातच आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे नुकसान होण्याचे टळले आहे.

राष्ट्रीय लोक अदालत रद्द

बुलडाणा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या दिशानिर्देशाप्रमाणे १० एप्रिल रोजी महाराष्ट्रात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आणि राष्ट्रीय लोक अदालतीत लोकांची गर्दी होणार असल्यामुळे ते राष्ट्रीय लोक अदालत अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

बुलडाणा : बुलडाणा-खामगाव मार्गावर भादोला गावानजीक झाड कोसळल्याने एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला मिळताच त्यांनी हे झाड बाजूला केले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

शेतकऱ्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

चिखली : तालुक्यातील शेलोडी येथील जळालेले रोहित्र बदलवून दिल्यानंतर अतिरिक्त रोहित्र देण्याचे महावितरणकडून आश्वासन मिळाल्याने शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शेतात सुरू केलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्याची मागणी

बुलडाणा : वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे ६ ते ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे मलकापूर येथील व्यापारी वर्गात नाराजीचा सूर उमटत असून प्रशासनाने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यासाठी व्यापारी असोसिएशनद्वारे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तलवारबाजी असोसिएशनची सभा उत्साहात

बुलडाणा : महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनची सर्वसाधारण सभा ४ एप्रिल रोजी पुणे येथे पार पडली. या सभेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या सभेला २८ जिल्ह्यातील ५० प्रतिनिधी उपस्थित होते.

अभ्यासिकेचा वेळ वाढवण्याची मागणी

बुलडाणा : शहरात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी एमपीएससीची तयारी करण्याकरीता अहोरात्र मेहनत करतात. त्यातील अनेक विद्यार्थी घरी अभ्यास नीट होत नाही म्हणून अभ्यासिका लावतात. मात्र अभ्यासिकेचा वेळ मर्यादित असल्याने त्यांचा अभ्यास होत नाही. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी

बुलडाणा : शेतकऱ्यांनी बँकांकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. मात्र कोरोनामुळे अनेक दिवस बँक बंद होती. तसेच वाहतूकही विस्कळीत होती. त्यामुळे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे पैसे भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पक्षकारांनी दक्षता घेण्याचे आवाहन

बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दुय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करिता येणाऱ्या पक्षकारांची संख्या विचारात घेता कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांनी दक्षता घ्यावी. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येण्यापूर्वी आपली दस्त नोंदणीची वेळ आरक्षित करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामे उपलब्ध करून देण्याची मागणी

बुलडाणा : रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील असंख्य मजूर वर्ग व कामगार घरीच असून समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना शासनाने तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

गहू काढणीचे दर वाढले

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या गहू काढणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना गहू हार्वेस्टद्वारे काढण्यासाठी एकरी दोन हजार रुपये मोजावे लागले. हरभरा काढणीच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक झळ बसली आहे.

ऑटोरिक्षा चालक आले अडचणीत

बुलडाणा : पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने ऑटोरिक्षा चालक अडचणीत आले आहेत. आधीच कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. अशात भाडेवाढ करणे योग्य नाही. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांना इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे.

दुकाने बंद नागरिक मात्र सुसाट

बुलडाणा : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र वाहतूक सुरू आहे. यामुळे नागरिक मात्र बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे.

Web Title: Fire in the hardware godown area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.