आगीत घर, गोठा खाक!
By admin | Published: May 17, 2017 01:23 AM2017-05-17T01:23:14+5:302017-05-17T01:23:14+5:30
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी येथे अवैध दारू विक्रेत्याने स्वत:च्या घराला आणि इतर गोठ्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी येथे अवैध दारू विक्रेत्याने स्वत:च्या घराला आणि इतर गोठ्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उपरोक्त घटना १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
नागझरी येथे चाटे कुटुंबात लग्न सोहळा होता. लग्नाची घटिका समीप येताच वर लग्न मंडपात प्रवेश करताच चाटे कुटुंबातील मधुकर चाटे यांच्या गोठा अािण बखारीला बछिरे नामक व्यक्तीने दारूच्या नशेत आग लावली आणि स्वत:च्या घरालाही आग लावून तो घटनास्थळावरून पसार झाला. गावाच्या पूर्वेला एका गोठ्याला आग लागल्याची वार्ता वऱ्हाडी मंडळीला कळताच सर्व वऱ्हाडी त्या दिशेने धावत सुटले, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. गावातील व्यक्तींनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. लग्नसमारंभात उभे असलेले पाण्याचे टँकर घटनास्थळी नेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मधुकर चाटे यांच्या बखारीतील २५-३० पोते गहू, हरभरा, तूर, स्प्रिकलर पाइप व शेतीपोयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. काही युवकांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील बैल, कोंबड्या व इतर जनावरे सोडून देऊन त्यांचे प्राण वाचविले.
आग इतरत्र पसरू नये, म्हणून घटनास्थळावर अरुण वाघ, साखरखेर्डा सरपंच महेंद्र पाटील, दरेगाव सरपंच बबन जायभाये, पं.स. सदस्य गजानन बंगाळे, अशोक वाघ यांनी मदत केली.