धाड येथे आग; ३ लाखांचे नुकसान
By admin | Published: February 16, 2016 12:51 AM2016-02-16T00:51:30+5:302016-02-16T00:51:30+5:30
इलेक्ट्रिकल साहित्यासह सुमारे तीन लाखांचे नुकसान.
धाड (बुलडाणा): स्थानिक शिवाजी महाराज चौकातील एका इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानास १४ रोजी रात्री दरम्यान अचानक आग लागली. या घटनेत इलेक्ट्रिकल साहित्यासह सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. धाड येथील चंद्रकला वसंतराव पडोळ यांनी आपल्या मालकीची जागा नारायण पंजाबराव वाघ यांना इलेक्ट्रिकल साहित्यविक्री दुकानाकरिता भाड्याने दिले. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सदर दुकानमालकाचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्यास पुढाकार घेतला होता. सोमवारी सकाळी तलाठी किशोर कानडजे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तर पोलिसांनीही आगीची नोंद घेतली आहे. नुकसानग्रस्त दुकानमालकास भरपाई देण्याची मागणी होत आहे.