सुंदरखेड येथील टीनशेडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:46+5:302021-02-27T04:46:46+5:30
वन विभागाचे क्षेत्र झाले जळून खाक सिंदखेड राजा : शहराला लागून असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात २४ फेब्रुवारी रोजी ...
वन विभागाचे क्षेत्र झाले जळून खाक
सिंदखेड राजा : शहराला लागून असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात २४ फेब्रुवारी रोजी आग लागून वनसंपदा नष्ट झाली. या आगीत विविध जातींची झाडेझुडपे होरपळून गेली आहेत. वन परिक्षेत्र खुले झाल्यामुळे शहरवासीयांनी या परिक्षेत्राला चक्क डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. २४ फेब्रुवारी राेजी वन विभागाच्या क्षेत्रातील जंगलाला आग लागली.
जानेफळ येथे साेमवारपर्यंत लाॅकडाऊन
जानेफळ : मागील तीन ते चार दिवसांपासून जानेफळ येथे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जानेफळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, तसेच गावात प्रशासनाच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी रूट मार्च काढून १ मार्च सोमवारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पाणीपुरवठा योजनेस तीन कोटींची मान्यता
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील तरोडा येथील नळ पाणीपुरवठा योजनेस तीन कोटी ३५ लाख पाच हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तराेडा गावातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
नवीन पाइपलाइनकरिता परवानगी द्या
लाेणार : नगराेत्थान महाअभियानअंतर्गत लाेणार शहर पाणीपुरवठा उपाययाेजना या कामाकरिता वनक्षेत्रातील जुनी पाइपलाइन काढून नवीन पाइपलाइन टाकण्याकरिता परवानगी देण्याची मागणी नगराध्यक्ष पूनम पाटाेळे यांनी केली आहे.
शेती झाली तोट्याची, शेतकरी संकटात
किनगाव राजा : काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, नगरपालिका क्षेत्र व काही भागांत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विकता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
महावितरणचे वीज चोरट्यांवर लक्ष
बुलडाणा : महावितरणने वीज चोरट्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात मागील आठवड्यात वीजचोरी पकडण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खामगाव परिसरातही रस्ता काम करणाऱ्या एका कंपनीला वीजचोरी केल्याप्रकरणी २१ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी पवार
बुलडाणा : जिल्हा केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी मनोहर पवार यांची निवड करण्यात आली. मलकापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
गावाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी
सुलतानपूर : येथील ग्रामपंचायत विकासकामांत खूपच मागे असून, विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुढील तीन महिन्यांत तुमची मागणी पूर्णत्वास नेऊ, असा शब्द दिला.
बांधकामाच्या साहित्याचे दर वाढले
धामणगाव धाड : सध्या नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर गगनाला भिडल्याने अनेकांचे घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे. पक्क्या विटांची कमतरता भासू लागली असून, विटांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
सिंदखेडराजा: तालुक्यातील १८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे. दरम्यान, तालुक्यात नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.