कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 02:01 PM2020-01-29T14:01:48+5:302020-01-29T14:02:24+5:30
बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली.
बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मध्यप्रदेशमधील डेलची (ता. महेदपूर जि. उज्जैन) येथील ट्रक चालक राधाकिसन चौहान (वय ३२) व क्लिनर वरदीराम सुर्यवंशी (वय ३०) हे दोघे बीड जिल्ह्यातील सोनपेठ येथून कापसाच्या गाठी घेऊन मध्यप्रदेशातील मेहतवाडा येत जात होते. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास बुलडाणा नजीकच्या राजूर घाटात आर-जे-जीसी-५३१७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाच्या गाठींना अचानक आग लागली. पाठीमागून येणाºया वाहन चालकाने ही बाब ट्रक चालकास सांगितली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवले. परंतू एवढ्या रात्री आग विझविण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आग वाढतच गेली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक डाव्या बाजूने उलटला. ट्रक चालकाने मोबाईलद्वारे घटनेची माहिती ट्रक मालकास दिली. मालकाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा नंबर मिळवत त्यांना कळविले. अग्निशामक विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांनी दुपारी अग्निशामक विभागाला फोन करुन पुन्हा घटनास्थळी बोलावले. पेटलेल्या कापसाच्या गाठी पूर्णपणे विझविण्यात आल्या. वृत्त लिहेपर्यंत अग्निशामक विभाग व पोलिसांची कारवाई सुरु होती.