बुलडाणा शहरात दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्रीची होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:27 PM2020-11-09T16:27:46+5:302020-11-09T16:27:55+5:30
दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यंदा बुलडाणा शहरात ५४ पैकी ३० फटाका विक्रेत्यांचेच स्टॉल राहणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान यंदा जवळपास दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
प्रामुख्याने बुलडाणा शहरात घाऊक फटाका विक्रेते नाहीत. खामगाव येथे एक होता. मात्र नियमबाह्य फटाक्यांच्या साठ्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे बुलडाण्यातील फटका विक्रेत्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात येवून जिल्हाधिकारी, पालिकेकडून त्यांना स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत शारीरिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क घालूनच फटाका खरेदी करावी अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान कोराना संसर्गाच्या भीतीमुळे काही विक्रेत्यांनी यंदा दुकाने न लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाचा फटका बसण्याची शक्यता
बुलडाणा शहरात दरवर्षी साधारणत: ५० फटाक्यांचे बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीच्या समोरील मोकळ्या जागेत स्टॉल लागतात. यावर्षी कोराना संसर्गामुळे यापैकी फक्त ३० दुकानेच लागणार आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या शहरातील व्यवसायात यंदा तुलनेने कमी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.
यंदा कमी प्रदुषण करणारे फटाके सर्वांनी आणले आहेत. विदेशी फटाके न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोराना संसर्गामुळे यावर्षी ५४ परवाना धारकांपैकी २५ ते ३० जणच प्रत्यक्ष स्टॉल लावणार आहेत. गेल्या वर्षीच दिवाळीनंतर फटाक्यांची नोंदणी केल्या जाते.
- सतीषचंद्र रोठे
अध्यक्ष फटाका असोसिएशन