खासगी रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा ताेकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:48+5:302021-01-13T05:29:48+5:30
बुलडाणा : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा ताेकडी असल्याचे चित्र ‘लाेकमत’ने रविवारी केलेल्या रियालिटी चेकमध्ये आढळले. अनेक ...
बुलडाणा : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा ताेकडी असल्याचे चित्र ‘लाेकमत’ने रविवारी केलेल्या रियालिटी चेकमध्ये आढळले. अनेक माेठ्या रुग्णालयांमध्ये केवळ आग विझवणारे अग्निशमन यंत्रच लावलेले आहे. तसेच अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्र अजूनही घेण्यात आलेले नाही.
दर ११ महिन्यांनी अग्निशमन यंत्रांची व आगीच्या संदर्भाने रुग्णालय सुरक्षित आहे की नाही, यासंदर्भात सर्वेक्षण करून पालिकेच्या अग्निशामक दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी खासगी रुग्णालयांकडून नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज करण्यात येताे. भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रियालिटी चेक केले असता रुग्णालयांमध्ये केवळ प्राथमिक स्वरूपाची यंत्रसामग्री आढळली. इतर सुविधांकडे मात्र, खासगी रुग्णालयांच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. तसेच रुग्णालयाची क्षमता पाहून तिथे अग्निशमन यंत्रणा कुठली हवी याविषयीचे सर्वेक्षण नगरपालिकेकडून करण्यात येते; मात्र मध्यंतरी नगरपालिकेतील अग्निशमन अधिकाऱ्यांचे पद रिक्त हाेते. सध्या हे पद भरलेले असले तरी शहरातील एकाही खासगी रुग्णालयाकडून अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भंडाऱ्यातील आगीची दुर्घटना पाहता नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याची गरज आहे.
वर्षातून एकदाच हाेते पाहणी
अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरणासाठी संबंधित खासगी रुग्णालये नगरपालिकेकडे अर्ज करतात. त्यानंतर त्यांची वर्षातून एकदाच त्यांची प्रमाणपत्र देण्यापुरती तपासणी हाेते. एकदा प्रमाणपत्र मिळाले की ११ महिने त्याकडे दुर्लक्ष हाेते. यादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये प्रमाणपत्र मिळवण्याच्या दिवशी असलेली यंत्रणा नंतरही कार्यान्वित आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नाही. त्यामुळे, अनेक खासगी रुग्णालयांचेही याकडे दुर्लक्ष हाेते. त्यामुळे खासगी रुग्णालयांसह शासकीय, खासगी कार्यालयांचे नियमित ऑडिट हाेण्याची गरज आहे.