शांतता क्षेत्रात फटाक्यांची आतषबाजी; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By योगेश देऊळकार | Published: September 20, 2023 05:26 PM2023-09-20T17:26:06+5:302023-09-20T17:26:22+5:30
शांतता क्षेत्रात फटाक्यांची आतषबाजी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील १५ जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मलकापूर : शांतता क्षेत्रात फटाक्यांची आतषबाजी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील १५ जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री याप्रकरणी ठिय्या आंदोलन केल्याने खळबळ उडाली होती. येथील गणेशोत्सव मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करून शांतता क्षेत्रात अशांतता पसरवली जात असल्याची तक्रार डॉ. प्रशांत पाटील यांनी केली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक स्मिता म्हसाये यांनी मिरवणुकीस थांबवून शांतता पाळण्याचे आवाहन केले.
मिरवणुकीस अटकाव केल्याने मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये वाद झाल्याची घटना रात्री ९:४० च्या सुमारास घडली. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. याप्रकरणी मंगळवारी रात्री पोलिस उपनिरीक्षक स्मिता म्हसाये यांनी शांतता क्षेत्रात फटाक्यांची आतषबाजी व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी अरविंद किणगे, बंटी पाटील, गौरव कोलते, तुषार पाटील, अजय नारखेडे, छगन चौधरी, गणेश चौधरी, अमित नाफडे, सचिन पाटील व इतर अशा १५ जणांविरुद्ध कलम १८६, १८८, ३४१ भादंवी व सहकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक करुणाशील तायडे करीत आहेत.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांविरुद्ध तक्रार!
गणेशोत्सव मिरवणुकीत अचानक पोलिस दाखल झाले व त्यांनी मिरवणूक थांबवली. यात पोलिसांनी पदाचा दुरुपयोग केला. पोलिसांनी शांतपणे चाललेल्या मिरवणुकीवर कारवाई केल्याचा आरोप करत याप्रकरणी चौकशी व्हावी व दोषींवर कारवाईची मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे केली.