बुलडाणा जिल्ह्यातील पहिली चारा छावणी आमसरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:32 PM2019-06-01T13:32:10+5:302019-06-01T13:32:16+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाईची स्थिती पाहता खामगाव तालुक्यातील आमसरी येथे जिल्ह्यातील पहिली चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, जवळपास एका दशकानंतर बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच चारा छावणी उभारण्याची वेळ आली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार तथा मुख्यमंत्र्यांनी आॅडीओ ब्रीजद्वारे सरपंचांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर सरपंचांनी चारा छावणीची मागणी केली होती. त्यासंदर्भाने पशुसंवर्धन विभागाने नव्याने अहवाल तयार करून जिल्ह्यात जवळपास २१ चारा छावण्या उभारण्याची अवश्यकात असल्याचे म्हंटले होते. २७ मे रोजी हा सुधारीत अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ६३ हजार गुरांसाठी प्रसंगी चारा छावण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र सोबतच जून २०१९ पर्यंत पुरेल ऐवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचेही नमूद केले होते. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने चारा छावणीबाबत गंभीरतने विचार करण्यास प्रारंभ केला होता. परिणामस्वरुप बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास एक दशकानंतरची पहिली चारा छावणी ही खामगाव तालुक्यातील पारखेड महूसल मंडळामध्ये येत असलेल्या आमसरी येथे चारा छावणी उभारण्यास जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी ३० मे २०१९ रोजी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश पारनाईक यांनी दुजोरा दिला आहे.
आमसरी येथील चारा छावणीसाठीचा प्रस्ताव नांदुरा येथील महादेव गोरक्षण संस्थेने पाठविला होता. त्यास अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता त्यांना करावी लागणार असून पाच लाख रुपयांची बँक गॅरंटीही प्रथमत: द्यावी लागणार आहे. दरम्यान, असे असले तरी २५ जानेवारी, १३ फेब्रुवारी, चार मे आणि १६ मे २०१९ च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत ही चारा छावणी चालवावी लागणार आहे.
चार छावणीत या सुविधा आवश्यक
प्रथमत: आग प्रतिबंधक यंत्रणा, आवश्यकतेनुसार लसिकरण, मोबाईल अॅपवर दररोज गुरांच्या संख्येची नोंद आणि छावणीतील गुरांचे टॅगिंग करावे लागणार आहे. सोबतच आजारी गुरांचे लसिकरण व त्यांची स्वतंत्र व्यवस्था ही छावणीत करावी लागणार आहे. चारा छावणी मालकाला या बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चारा छावणीतील गुरांपासून मिळणाºया शेणाची छावणी मालकाला विल्हेवाट लावण्याची मुभा किंवा अधिकार देण्यात आलेला आहे.
चारा छावणीवर महसूल विभागाचे नियंत्रण
जिल्ह्यात उभारण्या येणाºया या चारा छावणीवर महसूल विभागाचे पूर्णत: नियंत्रण राहणार आहे. तहसिलदार, एसडीपीओ यांना चारा छावणी उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एका दशकानंतर चारा छावणीची उभारल्या जात आहे. दरम्यान खामगाव तालुक्यात आणखी काही चारा छावण्या उघडल्या गेल्यास एका महिन्याचा त्यासाठीचा खर्च हा चार कोटी ५० लाखांच्या घरात जाऊ शकतो. तुर्तास संपूर्ण जिल्ह्यात फक्त एका संस्थेसच चारा छावीसाठीची परवानगी देण्यात आली आहे.
एक लाक मेट्रीक टनाची होती तुट
बुलडाणा जिल्ह्यात दहा लाख गुरे असून त्यांच्यासाठी वर्षाकाठी आठ लाख ४३ हजार मेट्रीक टन चाºयाची गरज भासते. पैकी जिल्ह्यात सात लाख २७ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध होता. एक लाख १५ हजार मेट्रीक टन चाºयाची तूट होती. मात्र रब्बी हंगामात कृषी पिकांच्या अवशेषातून ८५ हजार मेट्रीक टन आणि वाळलेला ३६ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध झाला आहे. जून अखेर पर्यंत हा चारा पुरेल. मोठ्या गुरांना प्रतिदिन सहा किलो तर लहान गुरांना प्रतिदिन तीन किलो चारा लागतो.