पहिलीला दहा लाख द्यावे लागले म्हणून वसुलीसाठी दुसऱ्या पत्नीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:12+5:302021-08-18T04:41:12+5:30
लग्न झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत विवाहितेचा छळ सुरू करण्यात आला होता. ही घटना चिखली तालुक्यातील सवणा येथील असून, पीडिता ...
लग्न झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांत विवाहितेचा छळ सुरू करण्यात आला होता. ही घटना चिखली तालुक्यातील सवणा येथील असून, पीडिता सध्या बुलडाणा येथील चांडक ले-आउटमध्ये राहते. पीडितेचा विवाह ९ डिसेंबर २०२० रोजी सवणा येथील महेंद्र केशव कस्तुरे याच्यासोबत झाला होता. लग्नापूर्वी ८ दिवसांअगोदर त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतरच तीन लाख रुपये द्या, नाहीतर लग्न मोडून तुमच्या मुलीची समाजात बदनामी करू, अशी धमकी महेंद्र व त्याच्या घरच्यांनी दिली होती. त्यामुळे नाइलाजाने पीडितेच्या भावाने लग्नापूर्वीच महेंद्रच्या खात्यात ३ लाख रुपये टाकले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पीडितेची सासू व नणंदांनी छळास सुरुवात केली. महेंद्रचे यापूर्वीच एक लग्न झाले होते. ही बाब पीडिता व तिच्या कुटुंबीयांना माहीत नव्हती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या पत्नीशी फारकती झाली आहे. तिला १० लाख रुपये द्यावे लागले. त्या १० लाख रुपयांची भरपाई तुम्ही केली पाहिजे, असे म्हणत पीडितेसोबत दुसऱ्या दिवशीच भांडण केले. आमच्या मर्जीप्रमाणे वागली नाही तर तुला सोडून देणे काही कठीण नाही, असे पीडितेला वारंवार धमकावण्यात आले. कंटाळून २५ मार्च २०२१ या दिवशी पीडितेने सात लाख रुपये आणण्यास नकार दिल्यावर तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी बुलडाणा येथे आली. ६ जून २०२१ रोजी ज्योतीचा नवरा व सासू बुलडाण्याला आले. ७ लाख देणे शक्य नसेल तर २० तोळे सोने द्या व तुमची आठ एकर शेती पाच वर्षांकरिता ताब्यात द्या अन्यथा आम्ही वागवणार नाही. तिच्या जीवाचे काय होईल आम्ही सांगू शकत नाही, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून १६ ऑगस्ट रोजी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पती महेंद्र केशव कस्तुरे ( वय ३७), सासू आशा केशव कस्तुरे (वय ६५), (दोघेही रा. सवणा ता. चिखली), नणंद संध्या रजनीकांत काकडे (रा. चिंचखेड ता. चिखली), आरती सूरज अढावे (वय २७, रा. सावंगी ता. जाफराबाद जि. जालना) व वर्षा संदीप गवई (४०, रा. पुणे) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या पत्नीचे व्हिडीओ दुसरीला दाखवायचा
पती माणसात नाही तो नपुंसक आहे, असा आरोप ठेवून महेंद्रच्या पहिल्या पत्नीने त्याच्याशी फारकती घेतली होती. याचा राग मनात ठेवून तो पीडितेला रात्रभर त्रास द्यायचा व म्हणायचा सांग मी माणसात आहे की नाही, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांपासून महेंद्र त्याच्या पहिल्या बायकोसोबतचे कॉल रेकॉर्डिंग ऐकायचा व व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहायचा. मोठ्या स्क्रिनवर लावून त्याकडे एकटक पाहायचा व पीडितेलादेखील पाहायला भाग पाडायचा.