आधी काढली रॅली, मग सुरू केले बेमुदत उपोषण
By ब्रह्मानंद जाधव | Published: October 2, 2023 07:09 PM2023-10-02T19:09:34+5:302023-10-02T19:09:54+5:30
मेहकर येथील शारंगधर बालाजी मंदिराचा मार्ग अडकला अतिक्रमाणात
मेहकर : शहराचे आराध्य दैवत असलेल्या शारंगधर बालाजींच्या मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील दुकाने हटवावीत, अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून येथील नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आधी मेहकर शहरातून रॅली काढण्यात आली, त्यानंतर उपोषण सुरू करण्यात आले.
बालाजी संस्थान, नृसिंह संस्थान आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा मागणी करूनही नगर पालिका प्रशासनाने रस्त्यावरील ही दुकाने हटविण्यात आली नाहीत. त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला. एक आठवड्यात ही कारवाई करण्याची मागणी करूनही कारवाई न झाल्याने बालाजी संस्थानचे विश्वस्त उमेश मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते संतोष मलोसे आणि भागवत महाराज भिसे यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. शहरातील हा प्रमुख मार्ग नृसिंह मंदिर, ओलांडेश्वर संस्थान, अहिल्याबाई होळकर दगडी धर्मशाळा येथे जातो.
तत्पूर्वी उपोषणकर्त्यांनी बालाजींचे दर्शन घेतले. बालाजी मंदिर ते नगरपालिका कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. उपोषणास शहर काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे), बालाजी संस्थान, नृसिंह संस्थान, चंद्रेश्वर व्यायाम शाळा, भारत तालीम संघ, बलविर व्यायामशाळा आदींनी आपला पाठिंबा जाहीर केला. वीसपेक्षा अधिक नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले.
शिवसेनेचे प्रा. आशिष रहाटे, किशोर गारोळे, जयचंद बाठिया, बालाजी संस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय सदावर्ते, नृसिंह संस्थानचे गोपाल पितळे, आशिष उमाळकर, डॉ.नंदकुमार उमाळकर, महेश रोडसमुद्रे, मंगेश तट्टे, अजय उमाळकर, मनोज सावजी, विनोद देशमुख, वसंत पराशर, द्वारकादास शर्मा, विठ्ठल खंदारकर, राधेश उमाळकर आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.