किन्होळावासीयांनी उभारले जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:29+5:302021-05-05T04:56:29+5:30
लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा ...
लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
३ मे रोजी किन्होळा गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर बाहेकर यांच्या हस्ते या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड सेंटरचे प्रभारी डॉ. सचिन वासेकर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव उपस्थित होते. उपरोक्त मान्यवरांनी यावेळी संपूर्ण आयसोलेशन सेंटरची पाहणी केली. यावेळी किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल साळोख, डॉ. अनिल पांढरे, डॉ. आकाश सदावर्ते, डॉ. स्वप्निल अनाळकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. भाग्यश्री खेडेकर, डॉ. दीपाली महाजन, उपसरपंच कल्पना राजपूत, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर, ग्रा. पं. सदस्य शेख आरिफ शेख रज्जाक, ग्रामसेवक रमेश मुंडे, कृषी सहाय्यक विष्णू डुकरे, शेख ताहेर शेखजी, भगवानसिंग राजपूत, दिनकर बाहेकर, बबनराव बाहेकर, अॅड. विश्वासराव बाहेकर व शिक्षकवृंदासह अनेक मान्यवर आणि गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
तुपकरांची साद, किन्होळावासीयांचा प्रतिसाद!
गावागावांत आयसोलेशन सेंटर उभारून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे केली होती. किन्होळा गावामध्ये ५ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. या गावात तत्काळ आयसोलेशन सेंटर उभारून कोरोनाला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचा तुपकरांनी निश्चय केला. चार दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात किन्होळा गावातील ज्येष्ठ आणि तरुण दोन्ही वर्गाची भेट घेऊन आपला संकल्प बोलून दाखविला. गावचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रभूकाका बाहेकर, सरपंच अर्चना जाधव, वसंत जाधव आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांनी याला पाठिंबा दिला. भारत विद्यालयाचे प्रा. अरविंद पवार यांनी विविध समित्यांचे गठन करून कामात सुसूत्रता आणली. गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक तरुण स्वयंसेवक म्हणून विविध समित्यांच्या माध्यमातून कार्यरत झाले आहेत.
किन्होळा पॅटर्न यशस्वी करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची : चावरिया
किन्होळा कोविड आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना जि. पो. अ. अरविंद चावरिया यांनी किन्होळा गावातील लोकांच्या समर्पित भावनेचे कौतुक करून कोविड आयसोलेशन सेंटरचा उपक्रम एकजुटीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.