बुलडाणा जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात, शिथिलतेची वेळ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:21 AM2021-06-12T11:21:13+5:302021-06-12T11:21:18+5:30
Buldana District Unlock : काही निर्बंध कायम ठेवून १४ जून पासून शिथिलतेच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधापैकी काही निर्बंध कायम ठेवून १४ जून पासून शिथिलतेच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत.
४ ते १० जून या सप्ताहामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३७ टक्के असून एकूण बेडपैकी ९.०३ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने अनलॉकच्या पहिल्या स्तरात जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात येणार आहे. ७ जून पासून जिल्ह्यात दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक सेवांसह बिगर अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दीड महिन्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले. त्यावेळी जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होता. यात सुधारणा हाेउन जिल्हा पहिल्या स्तरामध्ये आला आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला मोठा फटका बसला. ही बाब पाहता जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात असला तरी निर्बंध कायम ठेऊनच दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायांना चालना मिळून जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान होण्यास मदत मिळणार असली तरी मर्यादीत निर्बंध कायम राहरणार आहेत.