१२ गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार
By Admin | Published: September 24, 2016 02:38 AM2016-09-24T02:38:03+5:302016-09-24T02:38:03+5:30
लोकमान्य गणेशोत्सव अभियानात सहभागी ६0 मंडळांपैकी तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या १२ मंडळांची नावे जाहीर करण्यात आली.
नाना हिवराळे
खामगाव(जि. बुलडाणा), दि. २३- गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या लोकमान्य गणेशोत्सव अभियानातील सहभागी ६0 मंडळांपैकी जिल्ह्यातील तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या १२ मंडळांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नांदुरा तालुक्यातून प्रस्तावच नसल्याने या तालुक्यातील क्रमांक किंवा बक्षीस जाहीर करण्यात आलेले नाही.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ह्यस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारचह्ण या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाच्यावतीने लोकमान्य उत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या दहा दिवसांच्या कालावधीत गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविल्या गेले.
गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी, बेटी बचाव, साक्षरता, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडित देखावा सादर करणार्या मंडळाची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. या अभियानात सहभागी संबंधित मंडळांचा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. जिल्ह्यात ६५0 च्या जवळपास सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती, यापैकी ६0 गणेश मंडळाचे प्रस्ताव गणराया पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते.
गणराया पुरस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र तरीही गणेश मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून ६0 गणेश मंडळाचे प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांकडे प्राप्त झाले होते.
प्रस्ताव प्राप्त गणेश मंडळाला तालुकास्तरीय समितीने भेटी दिल्या. शासनाने ठरवून दिलेले देखावे संबंधित गणेश मंडळाने सादर केल्याची पाहणी केली व यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस तालुका स्तरावर संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी जाहीर केले.
उत्कृष्ट मूर्तिकारांसाठी तीन प्रस्ताव
लोकमान्य गणेशोत्सव अभियानांतर्गत मंडळांसोबतच मूर्तिकारांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून केवळ तीन मूर्तिकारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये हरिभाऊ राजाराम राऊत, देऊळगाव माळी, पंकज भारगड, चिखली, प्रा.योगेश आठवे, देऊळगाव राजा यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय प्रथम क्रमांक मिळालेले गणेश मंडळ
बुलडाणा - रुद्र गणेश मंडळ संगम चौक,
चिखली - सहकार्य गणेश मंडळ, डी.पी. रोड
देऊळगाव राजा -बाथ्री तेली गणेश मंडळ,
सिंदखेड राजा -कुमार गणेश मंडळ
लोणार -नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, सुलतानपूर
मेहकर -श्रीचंद्र गणेश मंडळ
खामगाव -तानाजी व्यायाम शाळा
शेगाव -लिओ गणेश मंडळ
संग्रामपूर -नवयुवक गणेश मंडळ, वरवट बकाल
जळगाव जामोद -जय बजरंग गणेश मंडळ, सावरगाव
मलकापूर -लेवा नवयुवक गणेश मंडळ
मोताळा -नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, पान्हेरा खेडी
लोकमान्य गणेशोत्सव अभियानातील १२ तालुक्यांतील प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या मंडळांना लवकरच बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
- अशोक सोनोने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलडाणा