पहिल्याच पावसात बंधारे ‘ओव्हर फ्लो’
By admin | Published: June 15, 2017 02:03 AM2017-06-15T02:03:09+5:302017-06-15T02:03:09+5:30
जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान : कृषी विभागाने बांधले होते बंधारे
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव कुंंडपाळ : लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ परिसरात १३ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सातही सिमेंट बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसाने अनेक झाडांची पडझड झाली असून, शेत जमिनही खरडून गेली आहे.
तसेच कृषी विभागाअंतर्गत करण्यात आलेले ढाळीचे बांधही पावसा्च्या पाण्याने फुटले असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीस प्रारंभ केल्याने पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले असून बियाणे खापूले असल्याने उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीच्या समस्येने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
लोणार तालुका कृषी कार्यालयाच्या पुढाकारातून देऊळगाव कुंडपाळ शिवारात सात सिमेंट बंधाऱ्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. यावर्षी पवसाला लवकरच सुरूवात झाली. १३ जून रोजी अचानक आलेल्या या वादळी पावसाने ते पूर्णपणे भरुन ओव्हर फ्लो झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने देऊळगाव कुंडपाळ शिवारात रमेश नरवाडे, रामभाऊ नरवाडे, सौ. अल्काताई राठोड, बबनराव सरकटे, भास्करराव सरकटे आणि दिलीप सरकटे यांचे शेतातील नदीवर प्रत्येकी पाच लक्ष खर्च करुन सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. भूगर्भातील जलस्तर वाढण्याच्या हेतुने सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यंदा प्रथमच ते पूर्णपणे भरुन ओव्हर फ्लो झाले आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतीचेही नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार!
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे कृषी विभागाने केलेल्या सिमेंट बंधऱ्यात पहिल्याच पावसाने मोठ्या प्रमाणावार पाणी साचल्याने या भागातील शेतीच्या सिंचनाची सुविधा होणार आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवल्याने हे पाणी जमिनीत मुरून परिसरातील जमिनीचा ओलावा कायम राहण्यास मदत होणार आहे. पर्यायाने खरीपा बरोबरच रब्बीच्या पिकांनाही सोय होणार आहे. अशाच प्रकारे कृषी विभागाने महत्वाच्या नद्या नाल्यावर बंधारे बांधून पाण्याची साठवणूक केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा या संदर्भात जनजागृती करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. यातून शेतीच्या उत्पन्नात निश्चित भर पडण्यास मदत होणार आहे.