पहिल्याच पावसात ‘जनुना’ पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:41 PM2019-06-25T14:41:07+5:302019-06-25T14:41:18+5:30
दीर्घ प्रतीक्षेनंतर रविवारी झालेल्या दमदार पावसाने जनुना परिसर पाणीदार झाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी होऊन दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या चौघांच्या परिश्रमाला व जिद्दीला निसर्गानेही साथ दिली. दीर्घ प्रतीक्षेनंतर रविवारी झालेल्या दमदार पावसाने जनुना परिसर पाणीदार झाल्याचे दिसून आले.
जनुना हे मोताळा तालुक्यातील ३५६ लोकवस्तीचे छोटेसे गाव. गावात कायमस्वरुपी पाणीटंचाई. दुष्काळावर मात करण्यासाठी गावातील गवंडी, टेलर, पेंटर व विद्यार्थी असे चौघे जण एकवटले. त्यासाठी निमित्त मिळाले वॉटर कप स्पर्धेचे. शामराव कळमकार, शिवाजी मानकर, संजय गायकवाड व योगेश मानकर या चौघांनी स्पर्धा काळातील ५० दिवसांमध्ये मिळालेले टार्गेट विभागून घेत पूर्ण केले. दुष्काळावर मात करण्यासाठी परिस्थितीशी संघर्ष करतांना पोटापाण्याची लढाई अनिवार्य होती. अनेक संवेदनशिल मनांनी त्याची दखल घेतली. चौघांनी गाव परिसरात मातीनाला बांध, कंटूर बांध, समतल चर व विहिर पुर्नभरण केले. या चौघांच्या परिश्रमामुळे बहुदा निसर्गही हळवा झाला. त्यांनी केलेल्या कामाच्या परिसरात पाणी भरले. त्यामुळे चौघांच्याही आनंदास पारावार उरला नाही. सिंदखेडपासून प्रेरणा घेत सुरु झालेला टोकाचा संघर्ष यशापर्यंत पोहोचला. राजकारणाच्या व्यवहारात फिट बसत नसल्याने अनेक समाजसेवकांनी जनुना गावाकडे पाठ फिरवली. परंतू निसर्गाला या चौघांचा संघर्ष भावला आणि त्याने भरभरुन दिले.