‘विठ्ठल दर्शन’ची पहिली फेरी रवाना
By admin | Published: June 29, 2017 12:19 AM2017-06-29T00:19:00+5:302017-06-29T00:19:00+5:30
आषाढी एकादशी यात्रा महोत्सव : आज दुसरी फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी २८ जून रोजी येथून निघालेल्या पहिल्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने ४६७ भाविक पंढरपूरला मार्गस्थ झाले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीची आस भाविकांना लागलेली असते. या भाविकांसाठी यावर्षी येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींची पहिली फेरी रवाना झाली. या एक्स्प्रेसला खासदार प्रतापराव जाधव, आ. अॅड. आकाश फुंडकर, रेल्वे विभागीय सल्लागार समिती सदस्य ज्ञानदेवराव मानकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, शरदचंद्र गायकी आदींनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून हिरवी झेंडी दाखविली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय शिनगारे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, जितेंद्र पुरोहित, आदिती गोडबोले, संतोष येवले, कृष्णा ठाकूर यांच्यासोबतच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरांची उपस्थिती होती. यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचे या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. एक्स्प्रेस सुटण्याची वेळ दुपारी ४ वाजताची असली, तरी जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील भाविक सकाळीच खामगाव येथील रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. यामुळे रेल्वे स्टेशन भाविकांची गर्दी व विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमले होते. पहिल्या फेरीने ४६७ भाविकांनी पंढरीची वाट धरली. यापासून येथील रेल्वे स्थानकावर ४०२ तिकिटांची विक्री झाली. या एक्स्प्रेसचे खामगाव ते पंढरपूरपर्यंत प्रवास भाडे १९५ रुपये, ज्येष्ठ महिलेसाठी १०० रुपये, ज्येष्ठ पुरुष १२० रुपये, तर बालकांसाठी रुपये असे यापासून येथील रेल्वे स्थानकाला ४४ हजार ११५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. भाविकांना तिकीट घेताना गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त खिडकीसुद्धा सकाळपासून सुरू करण्यात आली होती. तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक संजय भगत, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक यांच्यासोबतच उपस्टेशन प्रबंधक सुरेश गोळे, कुणालकुमार, बुकिंग लिपिक प्रशांत बनसोड, सोनाजी तेलगोटे, नीरज मिलिंद, टी.आय. देशपांडे, सी.आय. निकम, इंद्रपाल म्हसकर, व्ही.आर. वानखडे, इंदिराबाई ठाकूर, संजीवनी इंगळे, उमाबाई व इतरांनी परिश्रम घेतले. ही एक्स्प्रेस जलंब येथे पोहोचल्यानंतर अमरावती येथून निघालेल्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसच्या आठ बोग्या या एक्स्प्रेसला जोडण्यात आल्या. विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची दुसरी फेरी २९ जून रोजी रात्री ११ वा. खामगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. तसेच परतीच्या देखील चार फेऱ्या पंढरपूर ते खामगाव राहणार आहेत. ह्या फेऱ्या २९ जून, ३० जून, ५ जुलै व शेवटची चौथी फेरी ६ जुलै रोजी पंढरपूर येथून खामगावकडे निघणार आहे. परतीच्या फेरीची पंढरपूर येथून सुटण्याची वेळ दुपारी ४ वाजताची असून, ही फेरी दुसरे दिवशी सकाळी ८.३० वाजता खामगाव येथे पोहोचणार आहे. उर्वरित तीन फेरींना सुद्धा जनरलच्या बोग्या राहणार आहेत. दरम्यान, रेल्वे स्टेशनवर हरिओम गु्रप व सानंदा मित्र मंडळाच्यावतीने यावर्षीही भाविकांना फराळाचे पाकिट वाटप करण्यात आले. सकाळी ९ वाजता माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी कृउबास सभापती संतोष टाले, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अशोक मुळे, अनुप महाराज वानखडे, सुदामा महाराज राहाणे, आकाश भराटे, मेथकर महाराज, झाडोकार महाराज, दशरथ चराटे आदींसह इतरांची उपस्थिती होती.
विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची दुसरी फेरी २९ जून रोजी दुपारी ४.२० वाजता सुटणार होती. मात्र, मुंबई येथून कोच निघायला उशीर झाल्याने रि शेड्युलिंगनुसार ही फेरी तब्बल सहा तास उशिराने म्हणजेच रात्री ११ वाजता खामगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. याची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले.