सावळा होणार जिल्ह्यातील पहिले धूरमुक्त गाव!
By Admin | Published: July 6, 2017 12:07 AM2017-07-06T00:07:20+5:302017-07-06T00:07:20+5:30
रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नातून सावळा येथे ७५ गॅस जोडणी मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : बुलडाणापासून हाकेच्या अंतरावर असलेले सावळा हे शेतकरी नेते तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांचे गाव. या गावाचा तुपकरांनी अल्पावधीतच विविध विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला आहे. दरम्यान, गाव धूरमुक्त व्हावे व गाव परिसरातील वनराई टिकून राहावी, यासाठी ना.तुपकरांच्या प्रयत्नाने सावळा येथे ७५ गॅस कनेक्शन मंजूर झाले असल्याने, सावळा हे गाव जिल्ह्यातील पहिले धूरमुक्त गाव होणार आहे.
सावळा हे गाव डोंगराच्या कडेला वसलेले असून, आजूबाजूला घनदाट जंगल परिसर आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलातील वृक्षांची सातत्याने कत्तल होते. वृक्षांची कत्तल थांबाविण्यसाठी वन विभागामार्फत गाव पातळीवर वन समिती स्थापन करून समितीमार्फत लाभार्थींना २५ टक्के रक्कम भरून वन विभागामार्फत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात येते. या योजनेचा १०० टक्के लाभ मिळवून देण्यासाठी ना. तुपकरांनी वन विभागाचे अधिकारी, वन समिती अध्यक्ष, सचिव यांची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यात सावळा येथील ४१ लाभार्थींना गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून दिला होता. दरम्यान, उर्वरित सर्वच लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १६ मे रोजी उपवनसंरक्षक बी.टी. भगत व वन समितीचे अध्यक्ष डॉ. भानुदास जगताप, सचिव पी.एन. जाधव व वन परिक्षेत्र अधिकारी झोळे यांच्यासमवेत ना. तुपकरांनी बैठक घेऊन गावातील सर्व लाभार्थींना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी वन विभागाला निर्देश दिले होते. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत वन विभागाकडून उर्वरित ७५ लाभार्थींना गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आले असल्याने ना. तुपकरांच्या प्रयत्नांना यश आले आहे.