व्यावसायिक शिक्षणाची पाच कोटींची शिष्यवृत्ती प्रलंबित
By admin | Published: September 10, 2014 02:11 AM2014-09-10T02:11:57+5:302014-09-10T02:11:57+5:30
अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश.
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
खासगी संस्थांमार्फत व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण घेतलेल्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील २४ हजार ८00 विद्यार्थ्यांची गत तीन वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही शासनाने दिली नाही. केवळ लालफीतशाहीमुळे सुमारे ५ कोटी ९५ लाख रुपयांची शिष्यवृतीची रक्कम अडकून पडली आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थ्यांचे ५ कोटी २५ लाख रूपये, तर अकोला जिल्ह्यातील २ हजार ८00 विद्यार्थ्यांंची ७0 लाख रुपयांची शिष्यवृत्ती आहे.
उच्च तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळ हे खासगी संस्थांना व्यावसायिक शिक्षण देण्याची मान्यता देते. या संस्था दहावी पास, नापास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देतात. यामध्ये सुमारे १ हजार १९0 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही अभ्यासक्रम ६ महिन्याचे तर काही १ वर्ष आणि २ वर्षाचे अर्धवेळ व पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे प्रशिक्षण घेणार्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांंना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने भारत सरकारची इयत्ता दहावीनंतरची शिष्यवृत्ती देय आहे. वर्षाकाठी एका विद्यार्थ्याला २५00 रुपये दिले जातात. बुलडाणा जिल्ह्यात हे अभ्यासक्रम चालविणार्या ११0, तर अकोला जिल्ह्यात ६0 संस्था कार्यरत आहेत. २0११ -१२ ते २0१३ -१४ या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात २१ हजार विद्यार्थ्यांंनी विविध प्रशिक्षणाचे धडे घेतले; मात्र या विद्यार्थ्यांंना सामाजिक न्याय विभागाने अद्यापही शिष्यवृत्ती दिली नाही.