वॉटर कप स्पर्धेस पाच दिवसांची मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:47 PM2019-05-08T16:47:08+5:302019-05-08T16:47:16+5:30
धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
- नवीन मोदे
धामणगाव बढे: पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कामासाठी आणखी पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आठ एप्रिल रोजी सुरू झालेली ही स्पर्धा आता २२ मे ऐवजी २७ मे रोजी संपेल. त्यामुळे राज्यातील ७६ तालुक्यातील सहा हजार गावांना अधिक चांगले काम करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे.
या वर्षीची दुष्काळी परस्थिती, निवडणुकीची आचार संहिता ह्या सर्व बाबी विचारात घेता पाणी फाऊडेशनतर्फे स्पर्धा काळात पाच दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय आठ मे रोजी घेण्यात आला आहे.
मागील चार वर्षापासून राज्यातील ९० टक्के दुष्काळी भागात आठ एप्रिल ते २२ मे या दरम्यान ही स्पर्धा ४५ दिवस सर्व राज्यभर राबविली जाते. परंतू यावर्षी स्पर्धेचा कालावधी ५० दिवसांचा राहील. त्यानुसार २७ मे पर्यंत सहभागी गावांना कामे करता येतील. २८ मे रोजी कामाचे मोजमाप व तपासणी होईल. संपूर्ण राज्यात दुष्काळामध्ये हजारो गावे होरपळी जात आहेत. गावकर्यांची एकजूट आणि श्रमदानाच्या जोरावर लोकांमध्ये जनजागृती करून जलसंवर्धनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करून घेण्यात पाणी फाऊंडेशन यशस्वी होत आहे. २०१६ मध्ये अवघ्या तीन तालुक्यात, २०१७ मध्ये ३० तालुक्यात, २०१८ मध्ये ७५ तालुक्यात आणि २०१९ मध्ये ७६ तालुक्यातील सहा हजार गावापर्यंत दुष्काळाला हद्दपार करणारी लोकचळवळ आता पोहोचली आहे.
या वर्षी स्पर्धाकाळाच्या पाच दिवसांच्या मुदतवाढीने सहभागी गावांना आपली कामे अधिक चांगली करण्यासाठी पुरेसा वेळ व बळ मिळेल, अशी माहिती पाणी फाऊंडेशनच्या समन्वयक बिंदिया तेलगोटे यांनी दिली.