अवकाळी पावसादरम्यान बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 02:27 PM2019-11-10T14:27:51+5:302019-11-10T14:27:59+5:30
नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
या घटना प्रामुख्याने चिखली, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात घडल्या. विशेष म्हणजे याच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसादरम्यान आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. आॅक्टोबर महिन्यात चिखली तालुक्यात गिता राजेंद्र गोलाईत या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात किसन नारायण म्हस्के, रविंद्र बाबुराव गायकवाड, नारायण संतोष गायकवाड आणि रविंद्र दशरथ जाधव या चार व्यक्तींचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती विभागातून प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे हे मृत्यू झाले. दरम्यान, आता शासनस्तरावर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्यांना काय मदत शासन देते याकडे सध्या लक्ष लागून आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात या पावसामुळे २१ गुरांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात ही पशु हानी झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील नोंदी स्पष्ट करतात. २०१४-१५ या वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात अवकाळी पावसाने व्यापकस्तरावर पिकांची आणि जिवीत हानी केली आहे.
११ घरांची पडझड
अवकाळी पावसादरम्यान जिल्ह्यात ११ घरांची पडझड झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. यामध्ये एका झोपडीचाही समावेश आहे. शेगाव मलकापूर आणि बुलडाणा या तालुक्यात हे नुकसान आहे.