हनवतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:25 AM2017-12-20T01:25:42+5:302017-12-20T01:26:40+5:30
खामगाव (बुलडाणा): शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव (बुलडाणा): शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. पाचही जणांना उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हनवतखेड हे आदिवासीबहुल गाव असून, तेथे महात्मा फुले आदिवासी व मागासवर्गीय सेवा संस्था जळगाव जामोद संचालित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पटावर तीनशे विद्यार्थी संख्या आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनाने कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १९ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चर्चा सुरू असतानाच रवींद्र विठ्ठल मालोकार (स्वयंपाकी), संजय जगन्नाथ बोंबटकार, विजय गणपत राणे, भारत छगनराव कांबळे आणि सुनील अर्जुन उतपुरे हे पाच कर्मचारी बैठकीतून उठून बाहेर आले. पाचही जणांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन केले. या कर्मचार्यांनी एका चिठ्ठीत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन छळ करीत असल्याचा आरोप नमूद केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पाचही जणांना काही कर्मचार्यांनी तत्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दुपारी दीड वाजता येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे यांनी आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मागील आठवड्यात पाचही कर्मचारी व्यवस्थापनाची परवानगी न घेता बाहेरगावी निघून गेले होते. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने त्यांना वेतन कपातीची नोटीस बजावण्यात आली होती. तसेच मंगळवारी बैठकीसाठी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले होते. या कर्मचार्यांशी विचारविनिमय सुरू असताना हे कर्मचारी बैठकीतून उठून बाहेर गेले. हा सर्व प्रकार दबाव आणण्यासाठी करण्यात आला.
- अँड. दिनेश सातव, अध्यक्ष
महात्मा फुले आदिवासी व मागासवर्गीय सेवा संस्था, जळगाव जामोद