पाच वनराई बंधा-यांमुळे केदार नदी तुडुंब!
By Admin | Published: October 29, 2016 02:38 AM2016-10-29T02:38:33+5:302016-10-29T02:38:33+5:30
बुलडाणा जिल्ह्यात लोकसहभागातून जलक्रांती!
सुहास वाघमारे
नांदुरा, दि. २८- नायगाव परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केदार नदीवर पाच वनराई बंधारे तयार केले असून, त्यामुळे नदीचे पात्र तुडुंब पाण्याने भरले आहे. परिसरातील कोलासर, तिकोडी, शेलगाव मुकुंद व नायगाव या चार गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.
नायगाव येथील निनाजी तायडे यांनी गावातील नागरिकांजवळ लोकसहभागातून वनराई बंधारे बांधून जलसंवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला. केदार नदी पात्रात पाच बंधारे तयार करण्याचे ठरले. त्याकरिता देवेंद्र डामरे, रमेश डामरे, केदार ढोरे, सचिन तायडे, मयूर तायडे, नितीन तायडे, भागवत डामरे, आशिष तायडे, सभापती अनिल इंगळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी व गावकरी आदींनी त्या पाच बंधार्यांचा आर्थिक भार उचलला. प्रत्येक वनराई बंधारा हा आठ ते दहा फूट रुंद व सहा ते सात फूट उंच माती, मुरूम व रेतीच्या सहाय्याने तयार करण्यात आला. त्या बंधार्यातून पाणी पाझरू नये, याकरिता प्लास्टिक कागद व ताडपत्री याचा वापर करून पाणी साठविण्यात आले आहे. या प्रयत्नामुळे तीन किलोमीटर नदी पात्रात पाणी साठले असून, भूजल पातळीत झपाट्याने वाढ झाली. याचा फायदा परिसरातील शेतकर्यांना होत आहे. कोणताही शासकीय निधी व अधिकार्यांचे सहकार्य न घेता लोकसहभागातून झालेली ही जलक्रांती प्रेरणादायी आहे. या उपक्रमात त्यांना पंचायत समिती सभापती अनिल इंगळे, दिनकर गारमोडे, रामकृष्ण सपकाळ, नारायण डामरे, सुयोग माहुलकार, भागवत डामरे, गोविंदा चोपडे, गणेश सपकाळ, वाघ तसेच गावकर्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
बंधारे बांधणारा अवलीया.
नायगाव येथील निनाजी तायडे हे नायगाव येथील मानधन तत्त्वावर काम करणारे पोस्ट मास्टर आहेत. त्यांच्या नोकरीनंतरच्या वेळेत गावात स्वच्छता व इतर समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या तायडे यांना जलसंवर्धनाचे वेड आहे. प्रत्येक वर्षी गावातील तरुणांना एकत्रित करून लोकसहभागातून बंधारे गाव परिसरात व बाहेर तयार करण्यात ते पुढाकार घेतात. या कामासाठी आर्थिक झीजही त्यांना सोसावी लागते.
-नायगाव येथील गावकर्यांनी लोकसहभागातून पाच बंधारे तयार केले असून, नदीचे पात्र तीन किलोमीटरपर्यंंत तुडुंब भरले आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. लोकसहभागातीलही जलक्रांती प्रेरणादायी आहे.
- अनिल इंगळे,सभापती पं.स. नांदुरा.