बनावट अकृषक आदेश प्रकरणातील पाच भूखंडधारकांना अटक
By admin | Published: July 5, 2017 12:21 AM2017-07-05T00:21:57+5:302017-07-05T00:21:57+5:30
चिखली : शेतजमिनी अकृषक करून घेतलेल्या शेतमालकांपैकी पाच जणांना चिखली पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली असून, या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता १० झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : बनावट अकृषक आदेश प्रकरणात शासनाचा महसूल बुडवून तलाठी शेख, नायब तहसीलदार मोरे व मंडळ अधिकारी वाळके यांच्याशी संगणमत करून आपल्या शेतजमिनी अकृषक करून घेतलेल्या शेतमालकांपैकी पाच जणांना चिखली पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली असून, या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता १० झाली आहे.
उपविभागीय अधिकारी बुलडाणा या महसूल न्यायालयाचे बनावट स्वाक्षरी व शिक्यानिशी अकृषक आदेश तयार केल्याप्रकरणी चिखलीतील भूखंडधारकांसह तत्कालीन नायब तहसीलदार डब्ल्यू.एस.मोरे, मंडळ अधिकारी अशोक वाळके व तलाठी रियाज शेख असे एकूण १६ जणांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई ८ आॅक्टोबर २०१६ रोजी केली होती. दरम्यान, या प्रकरणातील १६ जणांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु २२ जून रोजी न्यायालयाने मंडळ अधिकारी वाळके यांचा जामीन अर्ज फेटाळला तर १४ जणांनी स्वत:हून त्यांचे जामीन अर्ज मागे घेतले आहेत, तर या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक झालेली आहे. दरम्यान, न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतल्याने या प्रकरणात पोलिसांना हवे असलेल्या १६ भूखंडधारकांपैकी शेख वसीम शेख मुस्ताक वय ३४, मो.आवेश शेख मुस्ताक वय २८, शेख मोहसीन अब्दुल कदीर वय ४५, शेख मोईन अब्दुल कदीर वय ४२, शेख मुजिब अब्दुल कदीर वय ३८ सर्व रा.नगर पालिकेजवळ वार्ड न.१० या पाच जणांना ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी तथा ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.