पाच हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: June 1, 2017 12:37 AM2017-06-01T00:37:01+5:302017-06-01T00:37:01+5:30
इतर, खुल्या प्रवर्गासाठी सात वर्षात १७० घरकुले
संदीप गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : गेल्या सात ते आठ वर्षांपासून घरकुल उद्दिष्ट व प्रवर्गनिहाय लोकसंख्या यातील विसंगतीमुळे इतर व खुल्या प्रवर्गातील लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहिले आहेत. आजमितीस स्वत:ची जागा असूनही इतर व खुल्या प्रवर्गाचे उद्दिष्ट नसल्याने घरकुलात नंबर लागेल, या आशेवर हजारो लाभार्थी आहेत.
नांदुरा तालुक्यात मागील सात-आठ वर्षांपासून मोठ्या संख्येने असणाऱ्या इतर व खुल्या प्रवर्गातील जनतेकरिता लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य घरकुलांचे उद्दिष्ट आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात नागरिक घरकुलापासून वंचित आहेत. सन २००९-१० मध्ये- ३४, २०१०-११ मध्ये -१९, २०११-१२ मध्ये- ५८, २०१२-१३ मध्ये- ००, २०१३-१४ मध्ये -००, २०१४-१५ मध्ये-१९, २०१५-१६ मध्ये- ४० असे सात वर्षांत केवळ १७० घरकुल इतर व खुल्या लाभार्थींना मिळाले. याच काळात एससी व एसटी प्रवर्गासाठी तब्बल १५५६ घरकुल मंजूर झाली आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास तालुक्यात इतर व खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या खूप जास्त आहे; परंतु त्याचा कोठेही विचार न करता घरकुलांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजना, आता नव्याने पंतप्रधान आवास योजना या नावाने सुरू करण्यात आली असून, यामधून १ लाख २० हजार, रोजगार हमी योजनेतून १७ हजार ८०० व शौचालयाचे १२ हजार, असे १ लाख ४९ हजार ८०० रुपये लाभ दिल्या जातो. या योजनेकरिता लाभार्थींजवळ स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे. जागा नसल्यास ५०० स्क्वे. फूट जागा खरेदीसाठी दीनदयाल उपाध्याय योजनेमधून ५० हजार देण्यात येतात. या सर्व गोष्टी असूनही आतापर्यंत केवळ उद्दिष्ट न मिळाल्याने हजारो लोक घरकुलांपासून वंचित आहेत. २०१६-१७ या वर्षातही परिस्थिती तीच असून, आता नव्याने मंजूर होणाऱ्या उद्दिष्टांमध्ये तरी इतर व खुल्या प्रवर्गासाठी मोठ्या संख्येने घरकुल मंजूर होणे आवश्यक आहे.
इतर व खुल्या प्रवर्गाच्या उद्दीष्टात वाए करण्यासाठी यापुर्वीही पाठपुरावा केल्या असून यावर्षी उद्दीष्ट नक्कीच वाढून मिळेल असे न झाल्यास या प्रवर्गातील अन्याय दूर करण्यासाठी शासनाकडे दाद मागावी लागेल.
- सुनिता संतोष डिवरे, उपसभापती पं.स.नांदुरा