जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास
By अनिल गवई | Published: July 21, 2023 08:46 PM2023-07-21T20:46:34+5:302023-07-21T20:47:06+5:30
तपासाअंती दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायाप्रविष्ट करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : धारधार शस्त्राचा वापर करून एकाच वेळी पाच जणांना जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करणाऱ्या एकास न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली. खामगाव येथील न्यायाधीश पी. पी. कुळकर्णी यांनी हा निकाल शुक्रवारी दिला.
खामगाव तालुक्यातील लांजुड येथे ३१ ऑगस्ट २०१२ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता आरोपी सुरेश अंभोरे यांनी लोखंडी सळई या घातक अवजाराचा वापर करून गावातील सोहीलशा नूरशाह (वय ५) याला डोक्यावर मारून जखमी केले. त्याचवेळी इमामशाह मंगलशाह (वय ५५) यास कपाळावर मारून जखमी केले. तर गुलजारखान गफ्फारखान यास जखमी करून अस्थिभंग केला, नियामतखान बलदरखान, समशेर खान बल्दरखान अशा एकूण पाच जणांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढविला.
याप्रकरणी समशेर खान बलदर खान यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात जलंब पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायाप्रविष्ट करण्यात आले. आरोप सिद्ध झाल्याने आरोपी सुरेश अंभोरे यांस शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाची बाजू अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील उदय आपटे यांनी मांडली. कोर्ट पैरवी पोहेकॉ चंद्रलेखा शिंदे-सावळे यांनी केली.
१३ साक्षीदार तपासले
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील उदय आपटे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. यात दोन डॉक्टर व सर्व जखमी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच तपास अधिकारी संतोष ताले यांची साक्ष महत्त्वाची ठरली.