पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:08 PM2019-08-23T15:08:13+5:302019-08-23T15:11:54+5:30
पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड: मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील करडी धरणालगत बाहेरगावाहून पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार असून धाड पोलिस त्यांचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील एका तालुक्यातून बुलडाणा शहरापासून सुमारे ३१ किमी अंतरावर असलेल्या धाड येथे एक अल्पवयीन मुलगी २० आॅगस्ट रोजी आपल्या नातेवाईकाकडे आली होती. धाड येथील बसस्थानकावर ती उतरली होती. दरम्यान बसस्थानकावर असलेल्या राहूल लोखंडे याने अल्पवयीन मुलीस त्याच्या दुचाकीवर बळजबरीने बसवून गावा लगतच्याच करडी धरणालगत नेले. सोबतच तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आपला कार्यभाग साधल्यानंतर राहूल लोखंडे याने त्याच्या चार मित्रांनाही तेथे बोलावून घेतले. या चार मित्रांनीही नंतर तेथेच अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. सागर गुजर, अक्षय पवार, शुभम पांदे, गणेश जाधव अशी अन्य चार आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलीने धाड पोलिस ठाण्यात २१ आॅगस्ट रोजी तक्रार दिली. प्रकरणाचे गांभिर्य पाहता धाड पोलिसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करत घटनास्थळाचा पंचनामा करून राहूल लोखंडे, शुभम पांदे, गणेश जाधव या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, अन्य दोन आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहे. धाड पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
या प्रकरणी धाड पोलिसांनी २१ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा बलात्कारासह, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुलडाणा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दुसरीकडे पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणीही बुलडाणा येथेच करण्यात आली असल्याची माहीती पोलिस सुत्रांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह बळीराम खंडागळे, ओमप्रकाश सावळे, प्रकाश दराडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.