कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:46 AM2021-06-10T11:46:45+5:302021-06-10T11:47:19+5:30
Khamgaon News : निमकवळा येथील शेतकरी संदीप इंगळे, प्रदीप इंगळे, विकास इंगळे यांच्या शेतात बांधलेल्या कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा वाहून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोरज : परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे निमकवळा येथील शेतकरी संदीप इंगळे, प्रदीप इंगळे, विकास इंगळे यांच्या शेतात बांधलेल्या कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा वाहून गेला.
सोबतच या शेतकऱ्यांच्या शेतातील पंधरा दिवसांपूर्वी लावगड केलेल्या कपाशीची झाडे ठिबकच्या पाइपसह वाहून गेली. शेतातील सुपीक माती खरडून गेल्यामुळे पुढील उत्पादनावर परिणाम होणार आहे. परिसरात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत शेतीमध्ये ढाळीचे बांध टाकण्यात आले.
परंतु याला पाणी जाण्यासाठी कुठेही जागा न ठेवल्याने पूर्ण शेतामध्ये पाणी साचले. त्यानंतर बांध फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने कांदा वाहून गेला. तलाठी अनिल शिंदे यांनी नुकसानाचा पंचनामा केला असून अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे.
आमचा उदरनिर्वाह सर्व शेती उत्पादनावर निगडित असून, झालेल्या नुकसानीसंदर्भात मदत लवकरात लवकर देण्यात यावी.
- बबनसिंग इंगळे,
शेतकरी, निमकवळा