गणेशोत्सवात चायनाच्या वस्तूंचा झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:56+5:302021-09-11T04:35:56+5:30
बुलडाणा: 'चीनी लाइट नहीं चलेगी, मेड इन इंडिया ही जलेगी' असा नारा काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणांवरून ऐकायला येत होता. ...
बुलडाणा: 'चीनी लाइट नहीं चलेगी, मेड इन इंडिया ही जलेगी' असा नारा काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणांवरून ऐकायला येत होता. मात्र आता त्याचा पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. सध्या गणेशोत्सवाची सजावट महागली असली, तरी सजावटींच्या साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आहे परंतु या सजावटींमध्ये आजही चायनाच्याच वस्तूंचा झगमगाट दिसून येत आहे. घरातील गणरायाची मूर्ती केवढही असली, तरी गणेशोत्सवात सजावटींवर भर दिल्या जातो. सजावटीच्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना समोर येतात परंतु यामध्ये सजावट कुठलीही असली, तरी लायटिंगशिवाय ती अपूर्णच. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर गणेश भक्तांची बाजारात गर्दी होती. गणरायांची मूर्ती खरेदी करत असताना प्रत्येक भाविक सजावटीचे साहित्यही खरेदी करत होते. त्यामध्ये चायनिज लायटिंग, मोतीमाळा व इतर सजावटीचे साहित्य प्रत्येकजण घेत असल्याचे दिसून आले.
चायनाच्या लायटिंगलाच का पसंती?
'मेड इन इंडिया'ची लाईटिंग शक्यतो दुकानातही मिळत नाही. एखादी असलीच तर त्याचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे किमतीत कमी आणि वेगवेगळ्या आकार, रंग व आकर्षक असलेल्या चायनाच्याच लायटिंगला ग्राहकांकडून जास्त प्रतिसाद मिळतो. सध्या लायटिंगचे दर हे ८० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत आहेत.
सजावटींच्या साहित्याला ग्राहकांचा प्रतिसाद
गणोशोत्सवात सजावटींच्या साहित्याला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. मागील वर्षी कोरोनाचा चांगलाच परिणाम जाणवला होता परंतु गतवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद चांगला आहे.
वृंदा खर्चे, विक्रेता.
लाईटिंगमध्ये अनेक प्रकार आहेत. ग्राहकांकडून नवनवीन लायटिंगची मागणी होते. सध्या कलरच्या लाईटचीही मागणी वाढलेली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू ठेवाव्याच लागतात.
गजानन मुजमले, विक्रेता.
काय म्हणतात ग्राहक...
गणेशोत्सव म्हटला की, सजावट आलीच. घरातील गणरायांसमोर सजावट करायची असेल, तर लायटिंग महत्त्वाची आहे. लायटिंग खरेदी करताना त्याची कंपनी न पाहता, त्याचे दर, लांबी, रूंदी आणि आकर्षकताच बघण्यात येते.
श्रीनिवास जोशी.
दरवर्षी गणरायांसाठी नवीन लाईटींग, मोतीमाळा, हार आम्ही खरेदी करतो. यंदा किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर अनेक निर्बंध असले तरी, नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
चेतन आंबेकर.
सजावट साहित्याचे दर...
लायटिंग : ८० ते १०००
शायनिंग बॉल : १० ते ५०
मोती माळ: १० ते १००
रोटेटिंग लाईट : १२० ते २५०
कमळाचा लाईट: १२० ते २००
गणरायासाठी छोटा मखर: ३०० ते ८००