ओसाड माळरानावर फुलविली हिरवळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:48+5:302021-03-10T04:34:48+5:30
चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या ...
चिखली : तालुक्यातील टाकरखेड हेलगा परिसरातील ओसाड माळरानावर छोटी-छोटी झाडे आज डौलाने डोलत आहेत. निसर्ग समृध्दी बहुउद्देशीय संस्था चिखलीच्या प्रयत्नांमुळे या भागातील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर चार हजार झाडे रूजली असून वर्षभरापासून या संस्थेचे सदस्य झाडे लावण्यासह ते जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील टाकरखेड हेलगा शिवरातील वनजमीन वनराईने नटावी, यासाठी निसर्ग समृद्धी बहुउद्देशीय संस्था चिखली या वृक्षप्रेमी संस्थेने पुढाकार घेतल्याने या ओसाड जमिनीचे आता रूपडे पालटले आहे.
संस्थेच्या सदस्यांनी वृक्षारोपणासह संवर्धनासाठी घेतलेल्या कृतिशील पुढाकाराने आज रोजी तब्बल चार हजाराच्या आसपास लहान-मोठ्या वृक्षांची हिरवळ या भागात पसरली आहे. टाकरखेड हेलगा येथील वनविभागाच्या ओसाड जमिनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेने १६ जून २०२० पासून हाती घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० तर दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०० असे एकूण ४ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण करताना प्रामुख्याने सर्व प्रकारची रोपे देशी प्रजातीची असावीत, या हेतूने वृक्षारोपांची निवड करण्यात आली. संस्थेने लावगड केलेल्या वृक्षारोपांपैकी ६५० रोपे हे देणगी स्वरूपात महाराष्ट्रासह परदेशातून मिळाले आहेत. वृक्षारोपण कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपण लागवड केलेली रोपे जगावीत व ओसाड बनलेला परिसर वनराईने नटवा याचा संकल्प हाती घेत लागवडी पश्चात अविरतपणे या वृक्षरोपांची निगा संस्थेच्या सदस्यांव्दारे घेतली जात आहे. संस्थेव्दारे संपूर्ण उन्हाळाभर हे काम केल्या जाणार असून या कार्यात वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन निसर्ग समृध्दी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
९० टक्के झाडे जगविली !
निसर्ग समृध्द संस्थेने गत पावसाळ्यात दोन टप्प्यात ४ हजार २०० रोपांची लागवड केली. यातील ९० टक्के झाडे जगली असून ओसाड परिसर हिरवागार झाला.
झाडे जगविण्यासाठी संस्थेच्यावतीने ठिबक पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. यासाठी पाण्याच्या रिकाम्या बॉटलचा वापर केला जात असून रिकाम्या बॉटल जमा करून त्यामध्ये पाणी भरून ते झाडांच्या मुळाशी ठेवले जात आहे. आजवर सुमारे ८०० झाडांना बॉटलचा आधार देण्यात आला आहे. उर्वरीत सुमारे ३ हजार २०० झाडांना पाणी बॉटल लावण्याचे काम संस्थेव्दारे सुरू आहे.