सुकडी बनली जनावरांचे खाद्य!

By Admin | Published: July 12, 2017 12:59 AM2017-07-12T00:59:00+5:302017-07-12T00:59:00+5:30

अंगणवाडीत : पोषण आहारातील सुकडीकडे बालकांची पाठ!

Fodder made animal feed! | सुकडी बनली जनावरांचे खाद्य!

सुकडी बनली जनावरांचे खाद्य!

googlenewsNext

मनोज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांना वितरित होणारी सुकडी बालकांऐवजी जनावरांच्या पोटात जाऊ लागली आहे. संपूर्ण मलकापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात ही सुकडी जनावरांचा चारा बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.
मलकापूर तालुक्यात सुमारे १४० अंगणवाडी केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत ० ते ३ वर्षे वयोगटातील ३ हजार ५४४ तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील ३ हजार १४५ अशा प्रकारे एकूण ६ हजार ६८९ लाभार्थी बालके असून, या बालकांना सुकडी, उपमा, सत्तू, खिचडी, मॅगीचे पाकीट, शिरा, चवळी व मटकी यासारखा पोषण आहार दिला जातो. या आहारापैकी वितरित होणारी सुकडी ही बालकांना खावीशी वाटत नसल्याने ती सुकडी जनावरांना दिली जाते. याबाबत सोमवार, १० जुलै रोजी ‘लोकमत’ने तालुक्यातील काही गावांमध्ये चौकशी केली तर काही गावांत जाऊन पाहणी केली असता सत्यता समोर आली.

सुकडीबाबत पालकांमध्ये गैरसमज!
सुकडीची पॅकिंग कधीची असेल, ती सेवन केल्याने आपल्या मुला-मुलींना काही त्रास तर नाही ना उद्भवणार, बालके जर खातच नाही तर त्याबाबत त्यांना घरात कुणी आग्रह तरी का करावा, असे प्रश्नार्थक वातावरण या पाहणी व चौकशीदरम्यान दिसून आले. बालकांना मिळणारी सुकडी ही वाया गेल्यापेक्षा जनावरांच्या पोटात गेलेली बरी! या मानसिकतेतून ही सुकडी ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांच्या घरी पशू पाळलेली आहेत. त्यांचा चारा बनत आहे. बालकांऐवजी ही सुकडी गुरांना खाऊ घातल्या जात आहे.

काही ठिकाणी मोबदला; कुठे मोफत वितरण!
घरातील सुकडी गोठ्यात गुरांपुढे टोपलीत मांडल्या जात आहे. अनेक ठिकाणी तर गुरे मालक ही सुकडी गावातून बालकांच्या घरून विनामोबदला अथवा मोबदला देऊन प्राप्त करतात. काही पालक तर स्वत: बालकांच्या हातून ही सुकडी गुरे मालकांकडे पोहोचवतात. असे वास्तव सुकडी या पोषण आहाराबाबत समोर आले आहे.

सुकडी जनावरांचा चारा झाल्याचे कुठेही निदर्शनास नाही. तथापि, नजरेआड कुणी जनावरांना टाकत असल्यास आपणास याबाबत काहीही माहिती नाही. यासंदर्भात कोठेही तक्रारदेखील प्राप्त नाही.
- एस.टी. चव्हाण,
बालविकास प्रकल्प अधिकारी, प.स. मलकापूर.

Web Title: Fodder made animal feed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.