चारा टंचाईचे सावट; उपाययोजनांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:53 PM2019-11-26T14:53:53+5:302019-11-26T14:54:30+5:30
पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर नुकसानाच्या आढावा बैठकीमध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी चारा उत्पादकांना चारा लागवडीचे बियाणे वितरित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू अद्याप कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांनाही चारा टंचाईवर ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सर्व चारा उत्पादक पिकांचे नुकसान झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मका, ज्वारी व सोयाबीन पिकांपासून मिळणारा चारा मिळणार नसल्यामुळे याबाबत आतापासून नियोजन करून उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना चारा उत्पादक पिकांचे बियाणे वितरित करावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी लागल्यास तो सुद्धा देण्यात यावा. शेतकºयांनी शेतातच चारा पिकांचे ‘प्लॉट’ घेवून चारा घ्यावा, असे आवाहनही तत्कालीन पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले होते. डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी आढावा बैठक घेऊन चारा टंचाईवरही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राजकीय घडामोडीत नुकसानाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पावसाने चाºयाचे नुकसान झालेले असतानाही अद्याप कुठेच चारा टंचाईवर उपाययोजना सुरू झाल्या नाहीत. भविष्यात चाºयाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासून योग्य त्या उपाययोजना केल्यास चाराटंचाईवर मात करता येऊ शकते. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बोरकर यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
पावसाने सडले कुटार
जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पासून मिळणाºया कुटारावरच गुरांचे पोषण होते. परतीच्या पावसापूर्वी ज्या शेतकºयांनी सोयाबीन काढली होती, त्यांचे कुटार शेतातच साठवून ठेवलेले होते. परंतू पावसाने अनेकांच्या शेतातील सोयाबीनचे कुटार भिजले. अति पावसाने काही ठिकाणी तर कुटार पुर्णता सडले आहे. त्यामुळे यंदा पशुपालकांकडे कुटार उपलब्ध नाही.
मक्याचा चाराही झाला नष्ट
या खरीप हंगामामध्ये २४ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. परंतू मका पीक पावसाने पुर्णता नष्ट झाले आहे. मका कणसावर कोंब आले. काही ठिकाणचे मका पीक गुरांना खाण्यासारखे सुद्धा राहिले नाही. त्यामुळे यंदा मका पिकाचा चाराही जिल्ह्यातील गुरांना मिळणार नाही.