शौचालय नसल्यास फौजदारी गुन्हे
By admin | Published: May 26, 2017 01:17 AM2017-05-26T01:17:13+5:302017-05-26T01:17:13+5:30
राशन व शासकीय दाखले योजना होणार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र अजूनही बरीच गाव हागणदारीमुक्त झालेली नाहीत. तर ग्रामीण भागात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत आहे. यापुढे शासनाने कठोर पावले उचलत ज्या कुटूंबाकडे शौचाय नसेल त्याला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तर त्याचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पदही अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन पंचायत समितीला तसे आदेश प्राप्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबात शौचाय असले पाहिजे, तसेच संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करुन गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व चांगले रहावे, यासाठी शासनाकडून गेल्या ५ ते ६ वर्षापासून वेगवेगळ्या नावाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेला मेहकर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली होती. शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पं.स. स्तरावरुन विविध उपक्रम राबविले होते. तर ज्यांचेकडे शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्यांचेवर नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अलीकडच्या काही वर्षामध्ये शौचालय बांधकामाची मोहीम थंडबस्त्यात सुरु होती.
सरपंच, उपसरपंच सदस्य पद अपात्र ठरणार
मेहकर तालुक्यात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत असल्याने शासनाचा उद्देश सफल होतांना दिसत नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातील ज्या गावात ज्या वार्डातून ग्रा.पं.सदस्य निवडून आला असेल त्या वार्डातील प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा नियमीत वापर असला पाहिजे, ही जबाबदारी त्या-त्या ग्रा.पं. सदस्यांची आहे. याप्रमाणे संपूर्ण गाव विहित मुदतीत हागणदारीमुक्त झाले पाहिजे, जर असे झाले नाही तर त्या गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचेवर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम कलम ३९ अ नुसार कारवाई करुन सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.
राशन व शासकीय दाखले, योजना बंद होणार
बुलडाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका स्वच्छता अभियानात पिछाडीवर असल्याने वरिष्ठ पातळीवरुन सक्ती करुन शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या कुटूंबाकडील शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्या कुटूंबाला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानामधील राशन बंद करण्यात येणार आहे. याशिवाय कोणताच शासकीय दाखले देण्यात येणार नाही.