परराज्यातील बालमजुरास मलकापूर येथून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:48+5:302021-03-31T04:34:48+5:30
चाईल्ड लाईन १०९८ या मोफत बाल मदत हेल्पलाईनद्वारे गुप्त माहितीवरून मध्य प्रदेश राज्यातील खालवा जिल्हा खंडवा येथील १५ वर्षीय ...
चाईल्ड लाईन १०९८ या मोफत बाल मदत हेल्पलाईनद्वारे गुप्त माहितीवरून मध्य प्रदेश राज्यातील खालवा जिल्हा खंडवा येथील १५ वर्षीय बालक रूपेश (काल्पनिक नाव) याला २८ मार्च रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन बुलडाणा आणि ग्रामीण पोलीस स्टेशन मलकापूर यांच्या संयुक्त पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. चाईल्ड लाईनमार्फत बालक बालमजुरीकरिता बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असल्याचे कळले होते. बालकाचा शोध घेऊन त्याच्या काळजी आणि संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठीचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना दिले होते. दरम्यान, ग्राम बाल संरक्षण समितीच्या मदतीने जलदगतीने बालकाचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, दुकाने निरीक्षक राजेश वनारे, समन्वयाने दिवेश मराठे, सागर राऊत, महिला पोलीस कॉन्स्टेबल शारदा पवार, वृषाली सरोदे, अनिल निंबालकर, समुपदेशक संध्या घाडगे, अमोल पवार यांच्या मदतीने बालकाला पुढील पुनर्वसनासाठी व परराज्यात कायदेशीर हस्तांतरणासाठी बाल कल्याण बुलडाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आले. या महिन्यातील ही दुसरी शोधमोहीम असून यापूर्वी आसाम राज्यातील बक्सा जिल्ह्यातील १५ वर्षीय बालकाचा शोध घेतला होता.